वर्षातील शेवटच्या रविवारी सिंहगड ’हाऊसफुल्ल’; खडकवासला चौपाटीवर वाहतूक कोंडी | पुढारी

वर्षातील शेवटच्या रविवारी सिंहगड ’हाऊसफुल्ल’; खडकवासला चौपाटीवर वाहतूक कोंडी

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : वर्षाखेरच्या रविवारी (दि. 25) सुटीच्या दिवशी सिंहगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता. गडावरील वाहनतळ भरल्याने घाटरस्त्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. खडकवासला धरण चौपाटीवरील पुणे-पानशेत रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीने पर्यटकांसह नागरिकांची गैरसोय झाली. राजगडावर काही मद्यपींनी उपद्रव घातल्याचे सांगण्यात आले.
रविवारी होणार्‍या गर्दीचा अंदाज असल्याने वन व हवेली पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले होते.

मात्र, अपेक्षापेक्षा अधिक पर्यटकांची गर्दी केल्याने वन विभागाच्या अधिकार्‍यांना रस्त्यावर उतरावे लागले. सिंहगड वन विभागाचे वन परिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे हे सुरक्षारक्षकांसह डोणजे, गोळेवाडी टोलनाक्यापासून घाटरस्ता, वाहनतळापर्यंत धावपळ असल्याचे दिसून आले. सकाळी अकरापासून पर्यटकांची संख्या दुपटीने वाढली. दिवसभरात गडावर वीस हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली. गडावरील खाऊगल्लीही पर्यटकांनी गजबजून गेली होती. सुरक्षारक्षकांची नजर चुकवून अनेक जण घाटरस्त्यात वाहने उभी करत होते. ती हटविण्यासाठी सुरक्षारक्षकांना मोठी कसरत करावी लागली. अधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत घाटरस्त्यात थांबून होते.

राजगडावर दिवसभरात दीड ते दोन हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली. गडावर मुक्कामास मनाई असताना काही उपद्रवी पर्यटक गडावर तंबू उभारून मुक्काम करत असून, रात्री दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचे सांगण्यात आले. पुरातत्त्व खात्याचे पहारेकरी बापू साबळे म्हणाले की, विनंती करूनही पर्यटक ऐकत नाहीत. सकाळी एका तंबूत दोन दारूच्या बाटल्या सापडल्या. मद्यपी पर्यटकांना रोखण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही.

उच्चांकी वाहनांची नोंद
यंदाच्या वर्षात गडावर दिवसभरात उच्चांकी वाहनांची नोंद झाली. दोन्ही मार्गांने गडावर पर्यटकांची चारचाकी 660 व दुचाकी 1322 वाहने आली. वाहनतळ भरल्याने अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागली. अतकरवाडी पायी मार्गावर सकाळपासून पर्यटकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.

नाताळच्या सुटीमुळे सिंहगडावर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी वन कर्मचारी, सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
                                                               – प्रदीप सकपाळ,
                                             वन परिक्षेत्र अधिकारी, पुणे वन विभाग

Back to top button