पुणे : मराठीला अभिजात दर्जासाठी राजकीय उदासीनता | पुढारी

पुणे : मराठीला अभिजात दर्जासाठी राजकीय उदासीनता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोणतीही भाषा ही दैनंदिन जीवनात तिचा वापर करणार्‍या भाषकांमुळे समृद्ध आणि प्रवाही होत असते. मराठीभाषकांनी देखील आपल्या भाषेविषयी प्रेम आणि आस्था बाळगणे आवश्यक आहे. राजकीय उदासीनतेमुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास विलंब होत आहे, असे मत विविध साहित्यिकांनी परिसंवादात रविवारी व्यक्त केले.

निमित्त होते साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित 22 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात ’मराठी अभिजातचे घोडे नेमके अडले कोठे?’ या विषयावरील परिसंवादाचे. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात विचारवंत आणि लेखक प्रा. हरी नरके आणि लेखक डॉ. रवींद्र शोभणे सहभागी झाले होते.

देशमुख म्हणाले की, राजकीय उदासीनता आणि मराठीभाषकांमधील निरुत्साह या दोन प्रमुख कारणांमुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यात अडथळा येत आहे. गेली 8 वर्षे केंद्र सरकारने हा विषय भिजत ठेवला. केंद्रीय स्तरावर सुरू असलेल्या मराठी साहित्य आणि मराठी भाषेच्या या अवहेलनेचा आपण तीव्र निषेध नोंदविला पाहिजे. राजकीय दबाव टाकून किंवा राजकीय अट घालून आपल्याला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवावा लागेल.

प्रा. नरके म्हणाले की, मराठी भाषा ही सर्वांत जुनी भाषा असून, यासंदर्भातील अनेक अधिकृत ग्रंथ, पोथ्या, शीलालेख उपलब्ध आहेत. विविध संतांनी देखील संस्कृतपेक्षादेखील मराठी भाषा जुनी असल्याचे दाखले दिलेले आहेत. आमचे संस्कृत भाषेशी वैर नाही; पण ती आमची आई होऊ शकत नाही. आमची आई मराठी भाषाच आहे, तर संस्कृत ही आमची मावशी आहे.

डॉ. शोभणे यांनी, केवळ साहित्य संमेलनांच्या व्यासपीठांवर चर्चेपुरता मर्यादित न राहता हा विषय पुढे सरकला पाहिजे. कन्नड साहित्यिक कानडी भाषेवर प्रेम करतात; परंतु ते इंग्रजी भाषेतदेखील निपुण असतात. असे असले तरी भाषेचा अभिमान बाळगत ते कन्नड साहित्याची निर्मिती करतात, असे सांगितले.

Back to top button