पुणे : पालिकेत अधिकार्‍यांची अनेक पदे रिक्त | पुढारी

पुणे : पालिकेत अधिकार्‍यांची अनेक पदे रिक्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका उपायुक्त, सहआयुक्त, प्रशासन अधिकारी, अधीक्षक, उपअधीक्षक, वरिष्ठ लिपीक या पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. शिवाय, सेवाज्येष्ठतेनुसार केली जाणारी पदोन्नतीही अनेक वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे रिक्त पदांची भरती आणि पदोन्नतीची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेच्या रिक्त पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे.

मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांची अनेक पदे भरण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू नाहीत. पदोन्नती प्रक्रिया थांबलेली आहे. परिणामी, अपुर्‍या कर्मचारीवर्गामुळे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडत आहे. कामे वेगाने मार्गी लागत नसल्याने शहराच्या कामावर परीणाम होत आहे.

महापालिकेत उपायुक्त पदाच्या 18 जागा आहेत. यापैकी 14 जागा या भरल्या असून, उर्वरित 2 महापालिकेतील सरळ सेवेतील आणि 2 जागा या प्रतिनियुक्तीसाठी आहेत. महापालिका सह आयुक्त या पदाच्या 22 जागा असून, त्यापैकी 11 जागा रिक्त आहेत. यामध्ये 4 जागा सरळ सेवेतील, 5 जागा पदोन्नती आणि 2 जागा या प्रतिनियुक्तीसाठी आहेत. प्रशासन अधिकारी या पदाच्या 69 जागा मंजूर असून, त्यापैकी 26 जागा रिक्त आहेत. अधीक्षक पदाच्या 80 जागा असून, त्यापैकी 34 जागा रिक्त आहेत. उपअधीक्षक पदाच्या 214 जागा असून, त्यापैकी 34 जागा रिक्त आहेत.

Back to top button