तडका : जलधारांची बरसात कर..!

तडका : जलधारांची बरसात कर..!

घरातील एखादा मुलगा रागारागाने निघून गेला किंवा एखादी वयस्कर व्यक्ती हरवली, तर घरातील लोक आधी त्यांचा सर्वत्र शोध घेतात. खूप शोधाशोध करून ती व्यक्ती सापडली नाही तर वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देतात की, अमुक तमुक वर्णनाची व्यक्ती हरवली आहे. शोधून देणार्‍यास बक्षीसही जाहीर केले जाते. तशीच काहीशी गत सध्या महाराष्ट्रात मान्सूनची झालेली आहे.

सध्या महाराष्ट्रातील बहुतांश धरणे कोरडी ठाक झालेली आहेत. धरणांच्या खाली दडलेली मंदिरे बाहेर येऊन प्रत्यक्ष ईश्वर लोकांना दर्शन देत आहे. हवामानाचा अंदाज घेऊन शेतकरी पेरणीची तयारी करून बसला आहे; पण आभाळाकडे पाहत राहण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही. ढग येतात, वारे फिरते आणि वरच्या वर विरून जाते, हे चित्र आपण पाहत आहोत. मे महिन्याची अखेर जसजशी जवळ येते, तसतसा उन्हाचा पारा वाढायला लागतो. काही भागांत आणि विशेषत: विदर्भात 46 ते 47 डिग्रीपर्यंत तापमान वाढत गेलेले असते. याच वेळी हवामान विभागाकडून मान्सूनची वाटचाल समजण्यास सुरुवात होते. हवामान विभागाबरोबरच आपल्या राज्यात किमान दोन डझन स्वयंघोषित हवामानतज्ज्ञ उदयाला आलेले आहेत.

या वर्षी मान्सून किमान आठ दिवस आधी येऊन धडकणार, असे अंदाज सर्वांनीच वर्तविले होते. यथावकाश मान्सून आलासुद्धा म्हणे. अंदमान, निकोबार बेटे, त्यानंतर तीन-चार दिवसांमध्ये केरळच्या सागरी किनार्‍यावर आणि तिथून मुंबईमार्गे मान्सून महाराष्ट्रभर पसरणार होता. तसा तो कोकणातील सागरपट्टीमध्ये आलासुद्धा होता म्हणे. आला आणि अवघ्या एक दिवसात चक्क गायबसुद्धा झाला आणि गेली पंधरा दिवस तो कुठे हरवला आहे, मान्सूनचा अंदाज पाणीपुरवठा करणार्‍या यंत्रणा आणि शेतकरी मंडळी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

पावसाचे आगमन लांबल्यामुळे मराठवाडा हा आता जवळपास टँकरवाडा झाला आहे. टँकर आल्याबरोबर शेकडो लोकांची उडणारी झुंबड पाणीटंचाईची तीव्र परिस्थिती दाखवत आहे. एक-एक दिवस काढणे जनतेला अवघड झाले आहे. टप्प्यात आला म्हणणारा मान्सून अजून बरसला का नाही, श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वार्‍या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पंढरपूरच्या दिशेने निघण्याच्या तयारीत आहेत. वार्‍या निघाल्या की, पाऊस येतो ही आपली सगळ्यांची श्रद्धा आहे. बा विठ्ठला, तुझ्या भक्तिभावात महाराष्ट्र चिंब भिजला असतानाच जलधारांची बरसात करून तहानलेल्या लोकांना, प्राण्यांना आणि इतर जीवांना तृप्त कर, एवढीच आमची प्रार्थना.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news