त्वरा करा! पोलिस शिपाई भरती सुरू; पुणे शहर, ग्रामीणमध्ये होणार नेमणूक

त्वरा करा! पोलिस शिपाई भरती सुरू; पुणे शहर, ग्रामीणमध्ये होणार नेमणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलिस, पुणे लोहमार्ग पोलिस आणि कारागृह पोलिस शिपाई भरती प्रक्रियेस सुरवात झाली आहे. यामध्ये पुणे पोलिस आयुक्तालयाअंतर्गत शिपाई चालक संवर्गातील 203 जागा, ग्रामीण पोलिस दलात पोलिस शिपाई पदासाठी 513 जागा, कारागृह विभागात कारागृह शिपाई पदासाठी 513 जागा आणि लोहमार्ग पोलिसांत 68 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयाअंतर्गत पोलिस शिपाई चालक संवर्गातील 202 पदे भरण्यात येणार आहेत. याची भरती प्रक्रिया 19 जूनपासून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात होणार आहे. यासाठी जानेवारी 2024 मध्ये अर्ज भरून घेण्यात आले होते. मात्र अचारसंहिता व इतर कारणांमुळे प्रक्रिया सुरू झाली नव्हती. शिपाई चालक संवर्गासाठी 202 जागा असून त्यासाठी 20 हजार 382 अर्ज आले आहेत. यामधील ईएसईबीसी संवर्गाअंतर्गत नव्याने लागू झालेले मराठा आरक्षण दहा टक्के असणार असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपायुक्त रोहिदास पवार उपस्थित होते.

भरतीसाठी कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये. भरती करून देण्याचे कोणी आमिष दाखवत असेल तर दक्षता अधिकारी हिम्मत जाधव (उपायुक्त विशेष शाखा) यांच्या 8975283100 या क्रमांकावर संपर्क साधावा. ही प्रक्रिया 12 जुलै 2024 पर्यंत चालणार आहे. 28 जून ते 03 जुलै या दिवशी पुणे शहरात पालखी बंदोबस्त असल्याने त्या दिवशी भरती प्रक्रिया घेण्यात येणार नाही.

आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर

पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस शिपाई यांची 448 व चालक पोलिस शिपाई यांची 48 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पोलिस शिपाई चालक या पदासाठी मैदानी चाचणी परीक्षा 19 जून ते 28 जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. पोलिस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी परीक्षा ही पारदर्शक व अचूक निर्णय होण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

कारागृह शिपाईपदासाठी ट्रान्सजेंडरचे अर्ज

कारागृह पश्चिम विभागासाठी कारागृह पोलिस शिपाई पदासाठी 513 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी 1 लाख 10 हजार 488 अर्ज आले आहेत. या पदांसाठी पाच ट्रान्सजेंडर व्यक्तींचे अर्ज आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पुणे पोलिसांची शिपाई चालक संवर्गातील भरती प्रक्रिया झाल्यानंतर राबविण्यात येणार आहे.

राज्य राखीव दलाच्या 362 पदांसाठी भरती

राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 2 पुणे येथील रिक्त असणार्‍या 362 शसस्त्र पोलिस शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया (दि. 19 जून) सुरू करण्यात येणार आहे. ही भरती बल गट क्रमांक 2 च्या मैदानावर सुरू होणार आहे. बुधवारी पहाटे पाच वाजता कागदपत्रांसह अलंकारण हॉल येथील प्रवेशद्वाराजवळ उपस्थित राहावे, अशी माहिती समादेशक नम्रता पाटील यांनी दिली आहे.

लोहमार्गच्या 68 जागांसाठी 3 हजार 182 अर्ज

लोहमार्ग पोलिस शिपाई पदासाठी 68 जागा असून, त्यासाठी 3182 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 19 जूनपासून या भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. भरतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी लोहमार्ग पोलिस भरतीदरम्यान तंत्रज्ञानाचा चोखपणे वापर करण्यात येणार आहे. यामध्ये मैदानी चाचणी दरम्यान प्रत्येक टप्प्यावर बायामेट्रिक तपासणी करूनच बक्कल नंबर मिळालेल्या उमेदवाराला पुढे मैदानी चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक टप्प्यावर व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे, असे पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.

हेही वाचा

  • 'नीट' गोंधळाविरोधात 'आप' देशभर आंदोलन करणार : संदीप पाठक
  • Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनावेळी भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
  • मनोज जरांगेंसाठी रेड कार्पेट, आमची साधी दखल नाही : लक्ष्मण हाके

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news