मंचर : ऑनलाईन दंडामुळे विद्यार्थी त्रस्त; महाविद्यालयाला जाण्यास अपुर्‍या एसटी बसमुळे गैरसोय | पुढारी

मंचर : ऑनलाईन दंडामुळे विद्यार्थी त्रस्त; महाविद्यालयाला जाण्यास अपुर्‍या एसटी बसमुळे गैरसोय

मंचर (ता .आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील विद्यार्थी घोडेगाव- गोनवडी येथील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षणासाठी ये -जा करत असतात. परंतु, मंचर आणि घोडेगाव येथून एसटीच्या अपुर्‍या फेर्‍या आणि वेळेत नसल्याने त्यांना मोटरसायकलवरून डबल, ट्रिपल सीट ये-जा करावी लागते. मात्र, पोलिसांची कारवाई होत असल्याने विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत.

आंबेगाव तालुक्यात घोडेगाव (गोणवडी) येथे शासकीय आयटीआय आहे. येथे शिक्षण घेण्यासाठी 25 ते 30 किलोमीटर अंतरावरून एसटीने ये-जा करावी लागते. राजगुरूनगर, नारायणगाव एसटी आगाराने आंबेगाव तालुक्यात एसटीच्या अपुर्‍या फेर्‍या असल्याने तालुक्यातील एसटी फेर्‍यांचे वेळापत्रक बिघडले आहे. अपुर्‍या एसटीमुळे मंचर येथून सुटणार्‍या एसटीच्या फेर्‍या रद्द केल्या जातात.

बहुतांशी विद्यार्थी 25 ते 30 किलोमीटर अंतरावरून मोटरसायकलवर दररोज ये-जा करत असतात. मात्र, वाहतूक पोलिस विद्यार्थ्यांना आडवून कागदपत्र ,लायसन्स तपासणीच्या नावाखाली त्रास देत असतात, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मोटरसायकलवर तरकारी माल घेऊन जात असताना पोलिस त्यांनाही अडवून एक हजार ते पाच हजार रुपये दंड करत असतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन 5 हजारांचा दंड आकारणी
पोलिस नियमाचे उल्लंघन केल्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ऑनलाईन दंड आकारत आहेत. दि.21 डिसेंबर रोजी अवसरी खुर्द येथील शहाबाज मोमीन हा विद्यार्थी गोणवडी आयटीआयवरून मोटरसायकलवर घरी येत असताना पोलिसांनी ऑनलाईन पाच हजार रुपयांचा दंड केल्याने वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.

Back to top button