महाळुंगे पडवळ : कांदा लागवडीसाठी महिलांच्या मजुरीत वाढ | पुढारी

महाळुंगे पडवळ : कांदा लागवडीसाठी महिलांच्या मजुरीत वाढ

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील रब्बी हंगामासाठीची कांदा लागवड वेगाने सुरू झाली आहे. मात्र, महिला मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढल्याने लागवडीसाठी येणारा खर्च वाढला आहे. परिणामी, शेतकरी त्रस्त झाला आहे.
सध्या 300 रुपयांपासून ते 700 रुपये रोज महिला मजुरी घेत आहेत. कळंब, महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, गिरवली, एकलहरे, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी आदी गावे डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येतात. त्यांना बारमाही पाणी उपलब्ध आहे.

पालेभाज्यावर्गीय पिकांबरोबर कांदा, बटाटा, ऊस या नगदी पिकांची लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते. आधुनिक साधनांचा व खते, औषधांचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. रब्बी हंगामातील कांद्याला बाजारभाव चांगला मिळेल या आशेने कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, कांदा लागवड हातानेच करावी लागते. यांत्रिकीकरणाचा वापर या ठिकाणी होत नाही.

पाण्यात कांदा लागवड महिलाच करू शकतात. लागवडीसाठी महिला मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. शेतकर्‍यांना वाहनातून लांबून मजूर आणावे लागत आहेत. यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आंबेगाव तालुक्याच्या उतर भागातील घोड नदीकाठावर असलेल्या गावांमध्ये कांदा हे आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. मात्र, मजूरटंचाईमुळे शेतकर्‍यांना वाहन पाठवून लांबून जिरायती गावातून मजूर आणावे लागत आहेत. वाहनासाठी दररोज अंतरानुसार एक हजार ते दीड हजार भाडे द्यावे लागत असल्याचे शेतकरी सदाशिव गाडे यांनी सांगितले.

महिलांना शेतात आणण्यासाठी चढाओढ
गेले तीन महिने सतत कांदा लागवडीसाठी महिला मजुरांची गरज भासत आहे. शेतकरी आहे त्या महिलांना शेतात खेचून आणण्यासाठी झटत असून, रोज काम केल्याने महिलांमध्ये मणक्याच्या आजारांबरोबर पायाच्या बोटांमध्ये चिखल्याचा आजार आढळून येत आहे.

Back to top button