पुणे : सायबर चोरट्यांचा व्यावसायिकाला गंडा | पुढारी

पुणे : सायबर चोरट्यांचा व्यावसायिकाला गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हायड्रॉलिक अ‍ॅसिड एक्स्ट्रॉक्ट ऑईल (सूर्यफुलाचे तेल) भारतात खरेदी करून विदेशात पाठविण्याच्या बहाण्याने तिघा सायबर चोरट्यांनी पुण्यातील एका व्यावसायिकाला तब्बल 37 लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना जून ते ऑगस्ट 2021 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी, सहकारनगर पोलिसांनी जेसी सारा, खुशबू दत्ता, फ्रॉक डेव्हिस या तिघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सातारा रोड परिसरातील एका 53 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जेसी सारा व फिर्यादींची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर तिने फिर्यादींसोबत संपर्क वाढवून इतर आरोपींसोबत संगनमत करून फिर्यादींना हायड्रॉलिक अ‍ॅसिड एक्स्ट्रॉक्ट ऑईल (सूर्यतेल) त्यांच्या कंपनीच्या वतीने भारतात खरेदी करून विदेशात पाठवून मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखविले.

फिर्यादी आरोपींनी दाखविलेल्या आर्थिक प्रलोभनाला बळी पडून खुशबू दत्ता नावाच्या बँक खातेधारकाच्या नावावर वेळोवेळी 37 लाख रुपये पाठविले. मात्र, त्यानंतर देखील त्यांना मालाची (तेलाची) डिलिव्हरी देण्यात आली नाही, तसेच गुंतवणूक केलेले पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करीत आहेत.

फसवणूक करण्याचा सायबर चोरट्यांचा हा पहिलाच प्रकार नाही. त्यांनी अशाप्रकारे अनेक व्यावसायिकांना आर्थिक गंडा घातला आहे. भारतातील एखाद्या वस्तूला विदेशात कशी मोठी मागणी आहे. (उदा. हायड्रॉलिक अ‍ॅसिड एक्स्ट्रॉक्ट ऑईल) त्याची भारतात खरेदी करून विदेशात विक्री करण्याचा सल्ला दिला जातो. जाळ्यात खेचण्यासाठी माल विक्री करणारा आणि खरेदी करणारा देखील याच टोळीचा सदस्य असतो. त्यानंतर पद्धतशीर पैसे घेऊन माल खरेदी करायला लावला जातो.

तो माल थेट गुंतवणूक करणार्‍याला न देता समोरच्या पार्टीला पाठविल्याचे सांगितले जाते. फसवणूक झाल्याचे लक्षात येत नाही तोपर्यंत संबंधित व्यक्ती त्यांच्या खात्यावर पैसे पाठवतो. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांकडे धाव घेतली जाते. त्यामुळे विदेशात माल विक्री करून नफा मिळवून देणार्‍या सायबर चोरट्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Back to top button