पिंपरी : सायबर विभाग सक्षम करणार : विनयकुमार चौबे | पुढारी

पिंपरी : सायबर विभाग सक्षम करणार : विनयकुमार चौबे

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी – चिंचवडमध्ये स्ट्रीट क्राईमपेक्षा सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होऊ होत आहे. या पार्श्वभुमीवर सायबर गुन्हे कमी करण्याकडे तसेच त्यांची उकल करण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच, प्रशिक्षीत मनुष्यबळ आणि आत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देत सायबर गुन्हे विभाग सक्षम करणार आहे. असे नवनियुक्त पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलीस आय़ुक्त विनयकुमार चौबे यांनी बुधवारी (दि. १४) मावळते पोलीस आय़ुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पिंपरी – चिंचवड आयुक्तालयाचा पदभार स्विकारल्यानंतर सर्व प्रथम संपूर्ण शहराची माहिती घेणार आहे असे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारताना येथील गुन्हेगारी, शहराची राजकीय, सामाजीक परिस्थितीची माहिती घेतली आहे. सायबर गुन्ह्यांविषयीही आमची चर्चा झाली आहे. सायबर गुन्हे विभागाच्या मनुष्यबळाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. त्यासाठी प्रय़त्न करणार आहे. प्रशिक्षित मनुष्य़बळ आणि आत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध झाल्यास सायबर गुन्ह्यांवर वचक बसू शकतो. तसेच तपास वेगाने होतो. त्यामुळे सर्वप्रथम हा विभाग सक्षम करण्यावर भर असणार आहे, असे चौबे यांनी सांगितले.

गुन्हेगारीच्या आलेखावर शहराची प्रगती

कोणत्याही शहराची प्रगती ही गुन्हेगारीच्या आलेखावर होत असते. जेथे गुन्हेगारी कमी तेथे उद्योगधंदे, मोठमोठया कंपन्या आपला व्यवसाय थाटतात. त्यामुळे शहराची प्रगती वेगाने होते. त्यामुळे शहर गुन्हेमुक्त करण्याकडे भर असणार आहे असे चौबे यांनी सांगितले.
विनयकुमार चौबे यांना सन २०२० मध्ये अप्पर पोलीस महासंचालकपदी बढती मिळाली आहे. मुंबई शहरात त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले आहे. यापूर्वी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिले आहे.. चौबे हे सन १९९५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपुर येथून शिक्षण पूर्ण केले आहे.

हेही वाचा;

Back to top button