पुणे : आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्षा फोडली | पुढारी

पुणे : आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्षा फोडली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आंदोलनात सहभागी न झाल्याने कात्रज परिसरात एका रिक्षाची तोडफोड करून रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आली. रिक्षाची तोडफोड तसेच चिथावणी दिल्याप्रकरणी बघतोय रिक्षावाला संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष केशव नाना क्षीरसागर, संजीव कवडे, तुषार पवार, बाबा सय्यद यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे. याबाबत रिक्षा चालक उदय चंद्रकांत शिर्के ( 46, रा. कसबा पेठ) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी टॅक्सीच्या निषेधार्थ शहरातील रिक्षा संघटनांकडून सोमवारी (12 डिसेंबर) आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी न होणार्‍या रिक्षाचालकांच्या रिक्षा फोडा, जाळा, असे चिथावणीकर वक्तव्य करण्यात आले होते. आंदोलनात सहभागी न झालेले रिक्षा चालक शिर्के कात्रज भागातील आंबेगाव परिसरात प्रवासी वाहतूक करत होते. त्या वेळी अज्ञातांनी रिक्षा अडवून रिक्षाची तोडफोड केली. तसेच शिर्के यांच्या कानशिलात मारून खिशातील 500 रुपये हिसकावून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तोडफोड करणार्‍या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करत आहेत.

बेकायदा आंदोलन करणार्‍या रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल

रॅपिडो बाईक टॅक्सी बंद होण्यासाठी रिक्षा चालकांच्या प्रमुख मागणीसाठी बाईक टॅक्सीविरोधी आंदोलन समिती पुणे यांनी सोमवारी सकाळपासून पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू केले. याप्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीर आंदोलन करणार्‍या रिक्षा चालकांसह संघटनेच्या पदाधिकार्‍यांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुण 37 रिक्षा चालक व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांना मंगळवारी अटक करण्यात आली.

यातील रिक्षा संघटनांचे मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, त्याबाबत रिक्षा संघटनांना माहिती देऊन चक्का जाम रद्द करावे असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले होते. परंतु सदरचे समितीने तात्काळ निर्णय घेऊनही बाईक टॅक्सी ऑनलाईन अ‍ॅप काढून न टाकल्यामुळे रिक्षा संघटनांनी बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील वाहतुकीस अडथळा

रिक्षा संघटनांचे पदाधिकारी व सुमारे 900 ते 950 रिक्षाचालक यांनी सोमवारी दिवसभर रस्ता बंद करून आंदोलन करत नागरिकांना वेठीस धरले. त्यामुळे संपुर्ण पुणे शहरामधील वाहतुक विस्कळीत होऊन नागरीकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे याप्रकरणी रिक्षाचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button