पाटस : भानोबा देवाच्या यात्रेत तब्बल 3132 दानवांचा पराभव | पुढारी

पाटस : भानोबा देवाच्या यात्रेत तब्बल 3132 दानवांचा पराभव

पाटस; पुढारी वृतसेवा : कुसेगाव(ता. दौंड)चे ग्रामदैवत श्री भानोबा देवाच्या दोनदिवसीय यात्रा उत्सवामध्ये आकर्षण ठरणारे देव-दानव युद्धात पहिल्या दिवशी 1 हजार 46 दानवांचा पराभव झाला. यात्रेच्या दुसर्‍या दिवशी शनिवार (दि. 10) सकाळी 12 वाजता सुरू झालेल्या देव-दानव युद्धात 1 हजार 86 दानवांचा पराभव देवाने केला. यंदाची यात्रा रेकॉर्ड ब—ेक करणारी ठरली. या वेळी सुमारे चार लाख अधिक भाविक यात्रेसाठी आले होते. यंदाही देवावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

श्री भानोबा देवाच्या यात्रेच्या दोनदिवसीय कालावधीत पारंपरिक पद्धतीने देवाचे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडले गेले आहेत. यात्रेच्या दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता भाविकांसाठी देवाची कथा पोवाड्यातून भाविकांना सांगण्यात आली, तर दुपारी 12 वाजता देवांबरोबर दानव युद्ध खेळण्यासाठी देवाच्या मंदिरासमोर आले. हे युद्ध सुमारे सुमारे अडीच तास चालले.

दुसर्‍या दिवशी मागील काळापेक्षा यंदाच्या यात्रेत सर्वाधिक 1086 दानवांचा पराभव देवाने केला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास कुसेगावच्या इतिहासात पहिल्यांदाच जंगी कुस्त्यांचा आखाडा गावाकडून भरवण्यात आला होता. यात शेवटची कुस्ती 51 हजार रुपयांची ठेवण्यात आली होती.

वसंतराव नांदवळकरसह रवींद्र पिंपळे यांनी उत्तमरीत्या भाविकांचे व पाहुण्यांचे लोकनाट्य तमाशातून मनोरंजन केले. दरम्यान, रविवारी (दि. 11) सायंकाळी ढोल-ताशाच्या गजरात नेहमीप्रमाणे कोयाळी (ता. खेड) येथील ग्रामस्थांच्या हाती कुसेगावकर श्री भानोबा देव देणार आहे. कुसेगावातील भोसलेवाडी येथील श्री भानोबा मंदिरात देवाचा पहिला मुक्काम असल्याने तेथील ग्रामस्थांनी भाविकांसाठी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

भाविकांची उत्तम व्यवस्था
कुसेगावने मागील 15 दिवसांपासून यात्रेची जय्यत तयारी केली होती. पार्किंग व्यवस्था, पाणी व्यवस्था, भाविकांना देवाचे दर्शन घेत यावे असे सूसज असे मैदान यंदा उपलब्ध केले. यात्रे पाळणे, आलेली खेळणी दुकाने असे योग्य नियोजन केल्याने भाविकांनी व पाहुण्यांनी यात्रेच्या गर्दीचे वातावरण पाहून गावचे कौतुक केले.

Back to top button