खेड शिवापूर: रविवारी रिपाइंकडून टोल बंद आंदोलन, महाविकास आघाडीचाही पाठिंबा | पुढारी

खेड शिवापूर: रविवारी रिपाइंकडून टोल बंद आंदोलन, महाविकास आघाडीचाही पाठिंबा

खेड शिवापूर, पुढारी वृत्तसेवा: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणारे नेते तसेच पुणे जिल्हा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून रविवारी (दि. ११) खेड शिवापूर टोलनाक्यावर टोल बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीसुद्धा सहभागी होणार असल्याचे रिपाइंचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण ओव्हाळ यांनी सांगितले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा तसेच शुक्रवारी (दि. ९) पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ”अनुदानासाठी सरकारवर अवलंबून का रहाता?” ”फुले, आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या.” असे वक्तव्य केले. यामुळे महाराष्ट्रातील तमाम हिंदु जनतेच्या आणि बौद्ध समाजाच्या भावनांना ठेच लागली आहे. या अगोदरही भाजपच्या अनेक नेत्यांनी असे बेताल वक्तव्य करून नागरिकांच्या भावना दुखावत समाजात जातीय विषमता पेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या निषेधार्थ रविवारी सकाळी दहा वाजता टोलनाक्यावर आंदोलन केले जाणार आहे. तसेच टोलवर वसुली बंद करून निषेधासाठी सहकार्य करावे, अशी विनंती टोलनाका प्रशासनास केली आहे. आंदोलनाचे नेतृत्व आरपीआय कामगार आघाडीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे व युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ओव्हाळ करणार आहेत.

Back to top button