पुणे : राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग पाटील | पुढारी

पुणे : राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग पाटील

पुणे, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग रामराव पाटील   तर उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांवर अनुक्रमे आमदार प्रकाश सुंदररावजी सोळुंके, प्रतापराव पुंजाजी ओहोळ यांची बिनविरोध निवड झाली. साखर संघाच्या सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीची दुसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यामध्ये २१ सदस्यीय संचालक मंडळापैकी एकूण २० सदस्यांची निवड संपन्न होऊन फक्त अनुसूचित जाती, जमातीची एक जागा पात्र मतदार यादीमध्ये उमेदवाराअभावी रिक्त राहिली आहे.

नवनिर्वाचित संचालक मंडळामधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिताची निवडणूक मुंबईतील नरिमन पाँईट येथील साखर संघाच्या साखर भवनात बुधवारी (दि.७) दुपारी एक वाजता निवडणूक निर्णय अधिकारी जे.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये पांडूरंग पाटील (राजारामबापू सहकारी साखर कारखाना-सांगली), यांची अध्यक्षपदी तसेच उपाध्यक्षांच्या दोन जागांमध्ये आमदार प्रकाश सोळुंके (लोकनेते सुंदररावजी सोळुंके माजलगांव सहकारी साखर कारखाना-बीड) आणि प्रतापराव ओहोळ (सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना-अहमदनगर) यांची निवड बिनविरोध झाल्याची माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी पत्रकान्वये कळविली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button