Nashik Police Mobile App : नाशिक परिक्षेत्रातील गुन्हेगारांच्या हालचालींवर आता ॲपच्या मदतीने वॉच | पुढारी

Nashik Police Mobile App : नाशिक परिक्षेत्रातील गुन्हेगारांच्या हालचालींवर आता ॲपच्या मदतीने वॉच

धुळे; पुढारी वृत्तसेवा : पोलीस विभागाच्या नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी आता एक विशेष ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून कुख्यात गुन्हेगारांची माहिती एका क्षणात सर्व परिमंडळात उपलब्ध करण्याची व्यवस्था होणार असल्याची माहिती, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी दिली आहे. (Nashik Police Mobile App)

धुळे येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पोलीस दलात होणाऱ्या अनेक अत्याधुनिक बदलांची माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रेड्डी, तसेच प्रदीप महिराळे व दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर बी जी शेखर यांनी सांगितले की ,गुन्ह्येगारांवर वचक राहावा, यासाठी त्यांना तपासणी करण्याची मोहीम राबवली जाते. यात संबंधित पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी या गुन्हेगाराच्या घरी जाऊन त्याची माहिती घेतात. मात्र आता हीच माहिती अद्ययावत करण्यासाठी पोलीस दलाने एक पाऊल पुढे टाकले आहे. यात गुन्हेगारांना ट्रॅप करण्यासाठी एक विशेष ॲप तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून संबंधित गुन्हेगाराचा फोटो तसेच त्याची माहिती, तो राहत असलेल्या पत्ता, त्याने स्थलांतरित केलेली ठिकाणे, त्याच्यावरील गुन्हे, त्याचा स्वभाव अशा बारीकसारीक माहिती अॅपमध्ये असणार आहे.

या सोबतच या गुन्हेगाराला घरी तपासण्यासाठी गेलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला ऑनलाईन माहिती अपलोड करावी लागणार आहे. या सर्व माहितीच्या आधारावर या गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ठेवमे सोपे होणार आहे. या ॲपचे काम ७० टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून सुरुवातीला नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. असे त्यांनी सांगितले.

फितूर साक्षीदारांवर कारवाई

नाशिक परिक्षेत्रामध्ये गुन्हे सिद्ध करण्याचे काम आणखी वाढावे, यासाठी न्यायालयाच्या मदतीने एका कार्यशाळेचे आयोजन केले जाईल. या कार्यशाळेत पोलिसांना तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. गुन्हे सिद्ध होण्याच्या कामात फितूर होणाऱ्या साक्षीदारांचे देखील नावे आहेत. फितूर होणाऱ्या साक्षीदारांवर न्यायालयाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. मात्र आता पोलीस दलाच्या माध्यमातून देखील कारवाई करण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक परिक्षेत्राला मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. या दोन्ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बैठकांमध्ये गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली जाते. नुकत्याच झालेल्या गुजरातच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यातील फरार गुन्हेगारांना महाराष्ट्रातून ताब्यात घेऊन गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशाच प्रकारचे सहकार्य या दोन्ही राज्यातील पोलिसांकडून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

धुळे जिल्ह्यातील अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या विरोधात यापूर्वी देखील कठोरपणे कारवाई केली आहे. मात्र आता ड्रोन च्या माध्यमातून अमली पदार्थाची शेती नष्ट करण्याची कारवाई केली जाण्याची पाऊले उचलली जाणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

आरोपी पळालेल्या प्रकरणात नवापूर पोलीसांची चौकशी

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाण्याच्या लॉकअप मधून कुख्यात गुन्हेगार पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या चौकशी अहवालात दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याच चौकशी अहवालाच्या पार्श्वभूमीवर नेमका दोष कोणाचा आहे, ही बाब तपासली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बनावट दारू प्रकरणात सोनगीर पोलिसांची चौकशी

धुळे तालुक्यातील कावठी शिवारातील मद्याचा कारखाना तालुका पोलिसांनी उध्वस्त केला. हे घटनास्थळ सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे या प्रकाराची देखील चौकशी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान दारूचा कारखाना उध्वस्त करणारे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांचा तपास पथकासह पोलीस महासंचालक बीजी शेखर यांनी सत्कार केला आहे.

हेही वाचा

Back to top button