Jignesh Mevani : काँग्रेसच्या पडझडीत जिग्नेश मेवाणी भाजपला पुरून उरला | पुढारी

Jignesh Mevani : काँग्रेसच्या पडझडीत जिग्नेश मेवाणी भाजपला पुरून उरला

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभेचे निवडणूक निकाल स्पष्ट झाले आहेत. भाजपने या निवडणुकीत अभुतपूर्व यश मिळवले आहे. गुजरातमध्ये भाजपने १५६ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवला सामोरे जावे लागले आहे. मात्र, काँग्रेस पक्षाच्या या पडझडीत काँग्रेस पक्षातील दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी विजय मिळवला आहे.

वडगाव विधानसभा मतदारसंघातून जिग्नेश मेवाणी यांनी भाजपच्या मणिभाई जेठाभाई वाघेला यांचा ४९२८ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत जिग्नेश मेवाणी यांना ९४,७६५ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या मणिभाई वाघेला यांना ८९,८३७ लोकांनी पसंती दिली आहे. या बरोबरच आपच्या दलपत भाटिया यांना ४४९३ मते मिळाली. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यात या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली होती. वडगाव विधानसभा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. (Jignesh Mevani)

२०१७ मध्ये अपक्ष निवडणूक लढवत मिळवला होता विजय (Jignesh Mevani)

२०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही जिग्नेश मेवाणी यांनी विजय मिळवला होता. ही निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. २०१७ साली त्यांनी भाजपच्या चक्रवर्ती विजय कुमार यांचा १९,६९६ मतांनी पराभव केला होता. जिग्नेश यांना ५५.२२ टक्के लोकांनी पसंती दिली होती. यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. २०२२ च्या निवडणुकीत जिग्नेश यांचे मताधिक्य घटले आहे. २०१७ मध्ये १९,६९६ इतके मताधिक्य होते, ते घटून ४९२८ इतके झाले आहे. (Jignesh Mevani)

वडगाव मतदारसंघात १७ टक्के दलित मतदार

बनासकांठा जिल्ह्यातील वडगाव मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या मतदारसंघात एकूण १७ टक्के दलित मतदार आहे. या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या २,९५,२८१ इतकी आहे. यामध्ये १,५०,१७३ पुरूष मतदार आहेत. तर १,४५,१०७ इतकी महिला मतदारांची संख्या आहे. (Jignesh Mevani)

हेही वाचलंत का?

Back to top button