पिंपरी : शहरात 11 महिन्यांत गोवरचे 306 संशयित रुग्ण | पुढारी

पिंपरी : शहरात 11 महिन्यांत गोवरचे 306 संशयित रुग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शहरामध्ये गेल्या 11 महिन्यांत गोवरचे 306 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील आतापर्यंत एकूण 8 जणांना लागण झालेली आहे. गेल्या चार वर्षांचा तुलनात्मक आढावा घेतला असता यंदा गोवर रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मुंबईमध्ये गोवरची साथ आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी शहरामध्ये गोवरचे 8 संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी 5 रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कुदळवाडी परिसरात प्रामुख्याने हे रुग्ण आढळले आहे.

यंदा प्रथमच रुग्णसंख्येत वाढ

शहरामध्ये गेल्या चार वर्षांत गोवरचे नेमके किती रुग्ण आढळले याची माहिती घेतली असता 2019 ते 2021 अशा तीन वर्षांमध्ये एकाही गोवर रुग्णाची नोंद महापालिका वैद्यकीय विभागाकडे झालेली नाही. तथापि, यंदा वर्ष 2022 मध्ये 1 जानेवारीपासून आज अखेर (दि. 3) एकूण 306 संशयित रुग्ण आढळले आहेत. नव्याने आढळलेले 5 रुग्ण आणि यापूर्वीचे तीन अशा एकूण 8 रुग्णांना गेल्या 11 महिन्यांत गोवरची लागण झाली आहे.

28 हजार बालकांचे सर्वेक्षण

गोवरची साथ लक्षात घेता महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने आत्तापर्यंत एकूण 1 लाख 30 हजार 551 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 4 लाख 82 हजार 818 इतक्या लोकसंख्येचे त्यामध्ये सर्वेक्षण झाले आहे. 5 वर्षाखालील 28 हजार 297 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. तर, 15 हजार 332 बालकांना व्हिटॅमिन एची मात्रा देण्यात आली आहे. 2 हजार 163 बालकांना गोवर रुबेला पहिला व दुसरा डोस दिला आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

गोवरची लक्षणे
अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे रॅशेस येणे
मुलांना सुरुवातीला खोकला आणि सर्दी ही लक्षणे दिसतात.
तसेच डोळे लाल होऊ शकतात.
बालकांमध्ये अशक्तपणा जाणवतो.

काय काळजी घ्याल ?
मुलांना गोवरची लक्षणे आढळल्यास शाळेत व गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये.
पालकांनी घाबरुन न जाता बालकावर तातडीने नजीकच्या महापालिका रुग्णालय/दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे.
घरच्या घरी उपचार करू नये किंवा आजार अंगावर काढू नये.
पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.

Back to top button