नागरिकांनी स्वतःहून काढली अतिक्रमणे; बांधकाम विभागाच्या नोटिशीने पळापळ | पुढारी

नागरिकांनी स्वतःहून काढली अतिक्रमणे; बांधकाम विभागाच्या नोटिशीने पळापळ

महाळुंगे इंगळे; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यालगत अतिक्रमणधारकांना नोटीस काढून रस्त्याच्या मध्यरेषेपासून 15 मीटर अंतरावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावर नागरिकांनी तत्परता दाखवून स्वतःच अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. फक्त अतिक्रमण काढून या रस्त्याचा वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल का? असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाने शुक्रवारी (दि. 2) चाकण-तळेगाव रस्त्यावर खराबवाडी येथून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली असून, त्यास स्थानिक नागरिक व प्रशासन सहकार्य करीत असल्याचे दिसून आले. शनिवारपासून तळेगाव चौक ते खराबवाडी व महाळुंगे, खालुंब्रे, सुधापूल, देहूफाटा, इंदोरी, माळवाडी व तळेगाव हद्दीत अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. आम्ही शासनाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे, त्यामुळे ते कधी ना कधी निघणारच आहे. पण, हे अतिक्रमण काढून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचा मागील 10 ते 15 वर्षांपासूनचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे, तो सुटेल का? असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

तर, याउलट काही नागरिकांनी याच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमणे करून करोडो रुपयांची उलाढाल केली आहे. काहींनी त्यावर व्यावसायिक गाळे काढून मोठ्या प्रमाणावर आर्थिक माया जमवली आहे. ते तर अजूनही अतिक्रमणे काढण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटिसा आल्याने असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले काही धनदांडगे लोक तोंड पाडून फिरत आहेत. ते अजूनही जागा खाली करण्यास तयार नाहीत.

Back to top button