पुणे : ‘झिका’ आरोग्य विभाग सतर्क | पुढारी

पुणे : ‘झिका’ आरोग्य विभाग सतर्क

पुणे : डासांपासून पसरणारा झिका विषाणूचा रुग्ण पुण्यात आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून पुणे शहर तसेच बावधन परिसरात ताप रुग्ण सर्वेक्षण अधिक वेगवान करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने बावधन भागात रोग नियंत्रण उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले, मात्र त्यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही. या भागात डासोत्पत्तीसाठी घरोघर सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले.

या भागात एडिस डासाची उत्पत्ती आढळून आलेली नाही. झिका हा डेंग्यू, चिकुनगुनियाप्रमाणेच डासांपासून एकापासून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरणारा विषाणू आहे. याची बाधा गरोदर महिलांना झाल्यास जन्माला येणार्‍या मुलांवर त्याचा परिणाम दिसतो. यामुळे मेदूंची वाढ अपुरी होते. यामध्ये मुलांचे डोके प्रमाणापेक्षा लहान होणे, त्याला गुलियन बॅरे सिंड्रोम होणे, मज्जातंतूविषयक आजार होणे ही लक्षणे दिसू शकतात.

काळजी कशी घ्याल ?

घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदानीचा वापर करा.
घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
तुम्हाला डायबिटीज, हायपरटेंशन, इम्युनिटी डिसऑर्डरसारख्या समस्या असतील, तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
प्रवास करून आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ही आहेत लक्षणे…

डोळे लाल होणे, प्रचंड डोकेदुखी, ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे आढळणार्‍या रुग्णांनी पुरेसा आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात.

उपचार काय आहेत ?

झिका विषाणूपासून बचाव करण्यासाठी अजून कोणतेही औषध उपलब्ध नाही. यामध्ये स्वत:ला डासांपासून दूर ठेवणे हा एकमात्र झिका विषाणूचा धोका टाळण्याचा उपाय आहे. या विषाणूस कोणीही घाबरून न जाता काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे.

 

 

 

 

 

 

Back to top button