पुणे : राडारोडा रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांचा पहारा! | पुढारी

पुणे : राडारोडा रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांचा पहारा!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नदी सुशोभीकरणाच्या आडून नदीपात्रात राडारोडा टाकण्यात येत असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने शुक्रवारी (दि. 2) प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राडारोडा टाकणार्‍या गाड्यांना मज्जाव करण्यासाठी तातडीने तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

शहरातून वाहणार्‍या मुळा-मुठा नदीकाठचे 44 किमी लांबीचे सुशोभीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या प्रकल्पाच्या कामासही प्रारंभ झाला आहे. संगमवाडी ते बंडगार्डन यादरम्यानचे काम बी. जे. शिर्के कंपनीकडून केले जात आहे. सध्या प्रकल्पाचे काम बंडगार्डन येथील गणेश घाट आणि बोट क्लब असे नदीच्या दोन्ही बाजूंनी वेगाने सुरू आहे. यामध्ये टो वॉलसाठी मुरूम भराव टाकण्याचे आणि संगमवाडीजवळ नदीपात्रात वाहने उतरण्यासाठी भराव टाकून रस्ता केला जात आहे.

मात्र, प्रकल्पाचे काम सुरू असलेली ठिकाणे सोडून दुसरीकडेच इतरांकडून नदीपात्रात राडारोडा टाकला जात आहे. हा राडारोडा कोण टाकत आहे, तो कोणाचा आहे, याबाबत प्रकल्पाचे काम करणार्‍या कंपनीला काहीही माहिती नाही. मात्र, या कंपनीच्या नावाने हा राडारोडा टाकला जात असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले.

या वृत्तानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच नदीपात्रात इतरांकडून राडारोडा टाकला जाणार नाही, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना काम करणार्‍या कंपनीला देण्यात आल्या आहेत. तसेच लवकरच नदीपात्राकडे जाणारे रस्ते बंद करून त्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची व्यवस्था केली जाणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते युवराज देशमुख यांनी सांगितले.

Back to top button