मंचर-जुना चांडोली परिसरातील दुसरा बिबट्या जेरबंद | पुढारी

मंचर-जुना चांडोली परिसरातील दुसरा बिबट्या जेरबंद

मंचर; पुढारी वृत्तसेवा : मंचर-जुना चांडोली रस्ता परिसरात दहशत निर्माण करणारा दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक बिबट्या पकडण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा पिंजरा लावला असता गुरुवारी (दि. 1) पहाटे दुसरा बिबट्या पकडला गेल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मंचर-जुना चांडोली रस्ता परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार येथे पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजर्‍यात 15 दिवसांपूर्वी एक बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर देखील या परिसरात बिबट्यांचा वावर दिसत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी आणखी एक बिबट्या व बछडे असल्याचे वनविभागाला सांगितले होते.

त्यानंतर वनपाल संभाजीराव गायकवाड, वनरक्षक पूजा कांबळे व टीमने पंचलिंगेश्वर मंदिराशेजारी पिंजरा लावला होता, त्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. जुना चांडोली रोड विकासवाडी, जाधववाडी परिसरात दहशत निर्माण करणारे बिबटे जेरबंद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान बिबटे जेरबंद झाले तरी नागरिकांनी सतर्क राहावे, शेतात एकटे जाऊ नये, मुलांनी शाळेत एकत्र जावे, कोठे बिबट्या दिसून आल्यास तत्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन वनपाल एस. एल. गायकवाड यांनी केले आहे.

Back to top button