Kolhapur news | कोल्हापूर परिक्षेत्रात १६ हजारांवर समाजकंटकांवर कारवाईचा बडगा | पुढारी

Kolhapur news | कोल्हापूर परिक्षेत्रात १६ हजारांवर समाजकंटकांवर कारवाईचा बडगा

दिलीप भिसे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत कोल्हापूर, सांगलीसह पाचही जिल्ह्यांतील मतदार संघात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस दलाने मोठी खबरदारी घेतली आहे. आचारसंहितेनंतर 16 मार्चपासून 5 मेअखेर गंभीर कारनाम्यांचे रेकॉर्ड असलेल्या तसेच समाजात दहशत माजविणार्‍या 16 हजार 149 समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. त्यात कोल्हापूरसह सांगली, सातारा व पुणे ग्रामीणमधील सराईतांवरील कारवाई लक्षणीय आहे.

कोल्हापूर परिक्षेत्रातील बहुतांशी सर्वच लोकसभा मतदार संघात हाय होल्टेज लढती होत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रचाराचा गदारोळ संपला असला तरी मंगळवारी मतदानाचा महत्त्वाचा टप्पा पार पडत आहेत. परिक्षेत्रातील सर्व लोकसभा मतदार संघात अटीतटीच्या लढतीमुळे राजकीय वातावरण तापल्याने मतदान आणि मतमोजणीनंतर पोलिसांना डोळ्यात तेल घालून रात्र-दिवस पहारा द्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने समाजकंटकांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातून 45 समाजकंटक हद्दपार

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणेने कमालीची खबरदारी घेतली आहे. निवडणूक काळात यापूर्वी गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या तसेच समाजात दहशत माजविणार्‍या 45 समाजकंटकांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 व 56 अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. दि. 16 मार्च ते दि. 5 मे 2024 या काळात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Back to top button