नर्‍हेत पुन्हा अपघात ! तीन वाहनांवर भरधाव टँकर आदळला | पुढारी

नर्‍हेत पुन्हा अपघात ! तीन वाहनांवर भरधाव टँकर आदळला

पुणे/धायरी : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नर्‍हे स्मशानभूमी परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी दुपारी एका टँकरने तीन वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मागील काही दिवसांत महामार्गावर स्मशानभूमी, भूमकर ब्रीज , नवले ब्रीज या परिसरात हे अपघात झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परत याच ठिकाणी दोन ट्रक एकमेकांवर आदळल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच 46, बीबी 8426 हा टँकर सातारा बाजूकडून मुंबईकडे भरधाव वेगात निघाला होता. नर्‍हे परिसरात रस्त्यावर असलेल्या तीव— उतारामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यावेळी टँकर पुढे चाललेल्या बीएमडब्ल्यू , होंडाई कार व टेम्पो ट्रॅव्हलर या तीन वाहनांना धडक दिली.

अपघाताची माहिती समजताच सिंहगड वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक उदयसिंग शिंगाडे, महिला पोलिस नाईक सोनवणे, रमेश माने, पवन माने, सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे बीट मार्शल अमोल तांबे, संतोष शेंडे हे तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. या वेळी होंडाई कारमध्ये चालक, चार विद्यार्थिनी भोरवरून पुण्याला येत होत्या, तर बीएमडब्ल्यू कारमधून एक जण महाबळेश्वरवरून कल्याण-डोंबवली येथे जात होता. तर टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन चालक सातार्‍याहून पुण्यास निघाला होता.

याप्रकरणी टँकरचालक मोहम्मद आक्रम (वय 20, रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश) याला सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या झालेल्या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. पुढील तपास सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव हे करीत आहेत.

दैव बलवत्तर म्हणून वाचलो…

दैव बलवत्तर म्हणून वाचलो, आम्ही कारमधून पुण्याकडे जात असताना येथे अचानक आमच्या कारला पाठीमागून जोरदार एका वाहनाने धडक दिली. आम्हाला क्षणभर काहीच समजले नाही. आमची कार रस्त्यावरच धडक दिल्याने गोलगोल फिरली. असे कारमधील मुलींनी सांगितले. तर सोमनाथ भोईर हे कल्याण येथील रहिवाशी असून, महाबळेर्श्वरहून मुंबईकडे निघाले होते. ते म्हणाले, बीएमडब्ल्यू कार घेऊन एकटा डोंबवलीला जात होतो. नर्‍हे परिसरात आल्यानंतर अचानक अतिवेगात पाठीमागून आलेल्या टँकरने माझ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेने माझी कार पुढे चाललेल्या होंडाई कारवर जाऊन आदळली, यामुळे मी प्रचंड घाबरलो.

Back to top button