पुणे : खुशखबर! 4 हजार 678 सदनिकांसाठी डिसेंबरमध्ये नोंदणी | पुढारी

पुणे : खुशखबर! 4 हजार 678 सदनिकांसाठी डिसेंबरमध्ये नोंदणी

पुणे; पुढारी वृत्तेसवा : पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा) डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 4 हजार 678 सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी दिली. ’आतापर्यंत विभागांतर्गत म्हाडातर्फे 34 हजार 493 सदनिकांसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारेच सोडत काढण्यात आल्या आहेत. डिसेंबर महिन्यातील सोडतीमध्ये संगणकीय ऑनलाइन प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

त्यानुसार आता अर्जदारांना आरक्षणानुसार जातीचे दाखले, प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, आधार-पॅनकार्ड तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता अर्ज भरतानाच करावी लागणार आहे, असे माने यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यांतर्गत सोडतीमध्ये चार हजार 678 सदनिकांचा समावेश आहे. त्यामध्ये म्हाडाच्या विविध योजनेतील दोन हजार 840, सर्वसमावेश योजनेंतर्गत (20 टक्के) एक हजार 435 आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांचा समावेश आहे. नवीन ऑनलाइन प्रणालीमुळे थेट आरक्षण, उत्पन्न मर्यादा आणि इतर कागदपत्र संगणकीय प्रणालीद्वारे भरताच पात्रता सिद्ध होणार आहे. केवळ सोडतीच्या जाहीर प्रकटनादिवशी पुढील कार्यवाही सुरू केली जाईल.

अर्ज भरण्यासाठी नवीन प्रणाली…
यापूर्वी केवळ ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा आहे. त्यानंतर विजेत्यांची प्रतीक्षा यादी जाहीर होत असे. तसेच कागदपत्रांची पूर्तता, छाननी आदी प्रक्रिया पार पाडली जात असताना नवीन आयएलएमएस 2.0 प्रणालीमुळे ही सर्व प्रक्रिया अर्ज भरण्यावेळीच घरबसल्या पूर्ण करावी लागणार आहे.

Back to top button