पुणे : सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली | पुढारी

पुणे : सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नवले पूल परिसरात वारंवार होणार्‍या अपघातानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानंतर आता महापालिका प्रशासनानेही सेवा रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर व बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. बंगळुरू-मुंबई महामार्गावर नर्‍हे परिसरात रविवारी (दि.20) रात्री भीषण अपघात झाला.

यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने प्रशासनाची बैठक बोलाविली होती. दरी पूल ते नवले पूल यादरम्यान असणार्‍या सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे झाल्याचे या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निदर्शनास आणून दिले होते. त्यावर विभागीय आयुक्तांनी सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे हटविण्याची सूचना केली होती.

त्यानुसार गेले दोन दिवस या भागातील अनधिकृत होर्डिंग आणि अतिक्रमणांवर महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. पहिले दोन दिवस राष्ट्रीय प्राधिकरणाने कारवाई केल्यानंतर गुरुवारी (दि.24) महापालिकेच्या बांधकाम विभागाने स्वामी नारायण मंदिरासमोरील केडीसी फुडवर्ल्ड ते गौरी हॉटेल या भागात अतिक्रण करून उभारलेल्या हॉटेल आणि शेडवर कारवाई करून सुमारे साडेअकरा हजार चौरस फूट क्षेत्रफळ मोकळे केले. या कारवाईत दोन जेसीबी, दोन कटर, दोन ब—ेकरचा वापर करून अनधिकृत शेड पाडल्याचे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंते युवराज देशमुख यांनी सांगितले.

 

Back to top button