नसरापूर : ग्रामीण पोलिस अडकलेत समस्यांच्या विळख्यात; ससेमिर्‍याच्या गर्दीत हरवते वर्दी | पुढारी

नसरापूर : ग्रामीण पोलिस अडकलेत समस्यांच्या विळख्यात; ससेमिर्‍याच्या गर्दीत हरवते वर्दी

माणिक पवार

नसरापूर : पोलिस म्हटले तर समोर उभे राहते रुबाबदार व्यक्तिमत्त्व… पिळदार शरीरयष्टी… आकर्षक पोलिस खाकी वर्र्दी… त्या वर्र्दीला समाजात असणरा मानसन्मान, तर भल्याभल्या गुंडांना घाम फोडणारे पोलिस… मात्र, पुणे ग्रामीण पोलिस गुरफटले जात आहेत सोयी-सुविधांच्या अभावात, कामाचा अतिरिक्त ताण, गुन्हेगारीशी संबंधित जीवन, यामुळे पोलिसांची शारीरिक, मानसिक व आरोग्याची हेळसांड होत असून, त्यांच्या कुटुंबाचीही नकळत ससेहोलपट होत आहे.

यापूर्वी पोलिसांबाबत काही धोरणात्मक योजना अमलात आणल्या गेल्या असल्या, तरी अतेरिकी हल्ला रोखण्यापासून गणेशोत्सव, नवरात्र, गावोगावच्या यात्रा-जत्रा, पंढरपूर वारी, ‘व्हीआयपी’ बंदोबस्तापासून पोलिस ठाण्यांच्या हद्दीत डोळ्यांत तेल घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कायम वर्दीतला माणूस ठाम उभा असतो. समाजामध्ये दैनंदिन जीवनात सतत बर्‍या-वाईट घटना घडत असतात.

यात प्रामुख्याने खून, घातपात, खुनी हल्ले, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार, फसवणूक, छळ, छेडछाड, प्रशासकीय बंदोबस्त, वाहतूक कोंडी या सर्व घडामोडींवर जागरूक राहावे लागते. छोटे-मोठे गुन्हे घडले, की त्याची शहानिशा करूनच गुन्हा नोंद करावा लागतो. राजकीय हस्तक्षेपामुळे अनेकदा कारवाईत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे वैताग वाढतो.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांचे दैनंदिन कामकाज 24 तास कार्यरत असते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत पोलिस ठाण्यात निरनिराळ्या प्रकारच्या फिर्यादी व तक्रारी देण्यासाठी नागरिक येत असतात. या वेळी एखाद्या गंभीर गुन्ह्यातही राजकीय नेते हस्तक्षेप करतात, त्यामुळे कारवाई आणि गुन्ह्याच्या तपासात अडथळा निर्माण होतो. या दिवसभराच्या घडामोडीने मानसिक संतुलन बिघडले, तरी सर्व घटकाशी त्यांना संयम राखून बोलावे लागते. यामुळे साहजिकच मानसिक स्वास्थ्य व चिडचिडेपणा हा केवळ हस्तक्षेपामुळे होत असल्याचे पोलिस कर्मचारी दबक्या आवाजात बोलत असतात.

Back to top button