पुणे : ऊस गाळप हंगामाला गती | पुढारी

पुणे : ऊस गाळप हंगामाला गती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 135 लाख टनाइतके ऊस गाळप पूर्ण झाले असून 8.30 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 112 लाख क्विंटल 13 हजार टनाइतके साखर उत्पादन तयार झाले आहे. ऊस गाळप हंगामाने आता गती घेतली आहे. सद्य:स्थितीत 159 साखर कारखाने सुरू झाले असून आणखी 50 कारखाने सुरू होण्याची अपेक्षा आहे. ऊस गाळप आणि साखर उतार्‍यात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली आहे. तर सोलापूर विभागात सर्वाधिक कारखाने सुरू असून साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे.

राज्यात 19 नोव्हेंबरअखेर 78 खासगी मिळून 159 कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झालेला आहे. गतवर्षी याच दिवशी 170 साखर कारखाने सुरू होते. त्यांनी 145 लाख टन ऊस गाळप, 127 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार केले होते. आणखी कारखाने सुरू झाल्यानंतर ऊस गाळप अधिक जोमाने सुरू होण्याची अपेक्षा आहे.

कोल्हापूर विभागात 33 साखर कारखान्यांनी मिळून 35.29 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर 9.69 टक्के साखर उतार्‍यानुसार 34.20 लाख क्विंटलइतके साखरेचे उत्पादन तयार केले आहे. पुणे विभागात 26 कारखान्यांनी 32.42 लाख टन ऊस गाळप तर 8.29 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 26.87 लाख क्विंटलइतके साखरेचे उत्पादन तयार केले आहे.

सोलापूर विभागात सर्वाधिक 41 साखर कारखाने सुरू आहेत. त्यांनी 36.44 लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तर 7.57 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 27.60 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन तयार केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात 22 साखर कारखान्यांनी 16.83 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर 7.85 टक्के साखर उतार्‍यानुसार 13.21 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार केले आहे. औरंगाबाद विभागात 6.25 लाख टन, नांदेड विभागात 6.73 लाख टन आणि अमरावती विभागात 1 लाख 8 हजार टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे.

राज्यात चालू वर्ष 2022-23 मध्ये 1 हजार 325 लाख टन ऊस गाळप अपेक्षित आहे. ऊस गाळप परवान्यासाठी 206 साखर कारखान्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी परिपूर्ण 180 कारखान्यांना ऑनलाइनद्वारे ऊस गाळप परवाने देण्यात आले असून 159 कारखाने सुरू झाले आहेत. परवाने दिलेले उर्वरित कारखाने सुरू होतील. त्यानुसार प्रतिदिन ऊस गाळप आणखी वाढेल. साखर कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू ठेवल्यास वेळेत उसाचे गाळप पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
                                                                                                                                                                                    पांडुरंग शेळके,
                               साखर सहसंचालक (विकास), साखर आयुक्तालय, पुणे.

Back to top button