संशयातून पत्नीचा कटरने गळा चिरला; पुण्यातील वडगाव शेरीतील प्रकार | पुढारी

संशयातून पत्नीचा कटरने गळा चिरला; पुण्यातील वडगाव शेरीतील प्रकार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा कटरने गळा चिरून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली. शिवशंकर शवरप्पा मेनसे (वय 30, रा. कुमठे, ता. उत्तर सोलापूर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी यल्लवा मेनसे (वय 30, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवशंकर याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 16) रात्री झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर हा वाहनचालक म्हणून काम करतो. त्याची पत्नी हाउसकीपिंगचे काम करते. शिवशंकर याचे दुसर्‍या महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. यल्लवा तीन वर्षांपासून त्याच्यापासून वेगळ्या राहतात. शिवशंकर याने पत्नीला बुधवारी जेवणाचा डबा घेऊन वडगाव शेरी भाजी मंडई परिसरात बोलावले होते. तेथे तो त्याची मिनी बस घेऊन थांबला होता.

बोलण्याच्या बहाण्याने त्याने पत्नीला गाडीत बोलावले. पत्नीसोबत वाद घालून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तू मोबाईलवर चांगले स्टेटस ठेवतेस, असे सांगून धारदार लोखंडी कटरने तिच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर गाडी चालू करून पळ काढला. प्रसंगावधान राखत पत्नीने चालत्या गाडीतून उडी मारली. तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तपास पोलिस उपनिरीक्षक कुमरे करीत आहेत.

Back to top button