उत्तरप्रदेशच्या ‘भोंदूबाबा’वर राजगुरुनगरमध्ये कारवाई | पुढारी

उत्तरप्रदेशच्या 'भोंदूबाबा'वर राजगुरुनगरमध्ये कारवाई

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : राजगुरूनगर येथे आलेल्या उत्तरप्रदेशातील इरफान अमिरुद्दीन तेली उर्फ मिया सुफिजी बाबा याच्यावर भोंदुगिरी करून फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी गुरुवारी (दि.१७) कारवाई केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना या बाबांच्या भोंदुगिरीची माहिती मिळाली. त्यानंतर राजगुरुनगर येथील एसटी बस स्थानकाजवळील इमारतीत कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून हा बाबा मोहिनी वशीकरण करण्यासाठी पैसे लुबाडणूक करत असल्याचे निष्पन्न झाले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या कायदेशीर सल्लागार ॲड. साधना बाजारे यांनी खेड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार इरफान अमिरुद्दीन तेली उर्फ मिया सुफिजी बाबा (रा. राजगुरुनगर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित भोंदू बाबाने पुजेसाठी पैशांची मागणी केली होती.

गुरुवारी (दि.१७) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ॲड. बाजारे व अनिंसचे कार्यकर्त्यांनी राजगुरुनगर एसटी स्टँड जवळ मियाॅँ सुफिजी बाबा यांच्याकडे समस्या घेवून गेल्यानंतर भोंदुगिरी करणाऱ्या बाबाने पैसे घेऊन फसवणूक केली, असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. भोंदूबाबाकडून करण्यात आलेल्या पैशांच्या मागणीचे आणि पैसे स्वीकारल्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केल्याचे देखील फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button