भोसरी : धरणे तुडूंब असतानाही पाणीपुरवठा अपुराच | पुढारी

भोसरी : धरणे तुडूंब असतानाही पाणीपुरवठा अपुराच

भोसरी : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही चांगला पाऊस होऊन सर्व धरणे तुडुंब भरलेली असूनही पिंपरी चिंचवडमध्ये दररोज 3 तास पाणीपुरवठा का केला जात नाही, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. तसेच मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असूनदेखील नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नियमित पाण्यासाठी वाट हे मोठे षडयंत्र आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेच्या गोष्टीबाबत पिंपरी चिंचवडच्या नागरिकांवर इतका अन्याय होणे शक्यच नाही.

शहरांतील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणीचे निवेदन सामजिक कार्यकर्ता अ‍ॅड. सचिन गोडांबे यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवडमध्ये ऑक्टोबर 2019 पर्यंत दररोज तीन तास पाणीपुरवठा होत होता. परंतु, नोव्हेंबर 2019 मध्ये अचानक दिवसाआड करण्यात आला व सहा तासांऐवजी पाच तासच पाणीपुरवठा होऊ लागला आहे.

ज्यात कधीकधी आणखी कपात होऊन साडेचार तासच पाणी प्रशासनाच्या वतीने सोडले जात आहे.19 ऑक्टोबरला बॉम्बे हायकोर्टाने पुणे, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागातील कमी पाणीपुरवठ्याबाबत 29 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. यावरून ही या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते.गृहनिर्माण विभागाच्या सूचनेनुसार प्रतिव्यक्ती प्रतिदिन 135 लिटर पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु तितका तो होत नाही. घरात पाणी येत नसल्याने असंख्य नागरिक पाणी भरण्यासाठी मोटारी लावतात. तसेच गरिबांना दिल्लीप्रमाणे किमान गरजेचे पाणी मोफत देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. परंतु गेल्या दोन वर्षांत पाणीबिलातही वाढ केलेली आहे.

Back to top button