पुणे : पुढारी वृत्तसेवा : सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठात शिक्षण घेणार्या एका विद्यार्थिनीने तिच्या रूममेटचे आक्षेपार्ह फोटो काढून युनिव्हर्सिटी कॅम्पसबाहेरील व्यक्तीला पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. या घटनेची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने समिती स्थापन केली असून, संबंधित विद्यार्थिनीला वसतिगृहातून काढून टाकून तिचे तात्पुरते निलंबन करण्यात आले आहे.
सीओईपी विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणार्या काही विद्यार्थिनींनी त्यांच्या एका रूममेटविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यात संबंधित मुलगी रूममधील मुलींचे आक्षेपार्ह फोटो त्यांच्या नकळत क्लिक करून विद्यापीठाच्या आवाराबाहेर इतर कोणाशी तरी शेअर करीत होती. त्यातच मुलींनी पोलिसांकडे तक्रार करूनही विद्यापीठ प्रशासन काहीही करीत नसल्याची पोस्ट एका विद्यार्थिनीने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याबाबत दाखल घेऊन चौकशी समिती स्थापन
केली आहे.
यासंदर्भात सीओईपीचे कुलसचिव डी. एन. सोनवणे म्हणाले, विद्यापीठाने आरोप झालेल्या विद्यार्थिनीला वसतिगृह कॅम्पसमधून काढले आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत विद्यापीठातून तिचे तात्पुरते निलंबन केले आहे. सीओईपी प्रशासन विद्यार्थ्यांना सुरक्षित व चांगल्या वातावरणात शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. कोणताही छळ, शोषण किंवा भीतीशिवाय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी पूरक वातावरण देण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे.
हेही वाचा