पॉलिग्रास हॉकी स्टेडियमवर खर्च सुरूच ; आयुक्तांकडून खर्चास हिरवा कंदील | पुढारी

पॉलिग्रास हॉकी स्टेडियमवर खर्च सुरूच ; आयुक्तांकडून खर्चास हिरवा कंदील

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमयवर
सुधारणेचया नावाखाली सातत्याने कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. आता पुन्हा चार कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. तेथील दिवे बदलण्यासाठी तब्बल 5 कोटी 50 लाख खर्च करण्यात आला आहे. त्यासाठी जागतिक हॉकी महासंघाच्या नियमाचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यावर ‘पुढारी’ने अबब..! एका खांबासाठी कोटीचे हायमास्ट दिवे; हॉकी स्पर्धेसाठी नेहरूनगर स्टेडियमवर उधळपट्टीचा सिलसिला कायम, असे ठळक वृत्त 27 एप्रिलला प्रसिद्ध केले होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर आता स्टेडियम अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी 3 कोटी 95 लाखांचा खर्च केला जाणार आहे.

त्यासाठी स्थापत्य क्रीडा विभागाने 5 कोटी खर्चाची निविदा काढली होती. त्याला 6 ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. त्यात 2 ठेकेदार पात्र ठरले. यशक असोसिएटची 23.59 टक्के अशी लघुत्तम दराची निविदा पात्र ठरली. ते हे काम 3 कोटी 95 लाखांत करणार आहेत.
स्टेडिमय अत्याधुनिक पद्धतीने विकसित केले जाणार आहे. त्यासाठी स्थापत्यविषयक करण्यात येणार आहे. कामाची मुदत दीड महिने आहे. एकाच खेळाच्या हॉकी स्टेडिमयवर सातत्याने उधळपट्टी केली जात असल्याने क्रीडाक्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

एकाच खेळावर वारंवार खर्च

हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. या खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडिमय महापालिकेने उभारले आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड हॉकी अ‍ॅकॅडमी सुरू केली. मैदानातील खराब हिरव्या रंगाची पॉलिग्रास काढून निळ्या रंगाची पॉलिग्रास टाकण्यात आली. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये राष्ट्रीय हॉकी स्पर्धा घेण्यात आली. आता सहा देशांची कनिष्ट गट हॉकी स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्याच त्याच बाबींसाठी पालिकेकडून मोठा खर्च केला जात असून, कोट्यवधीची उधळपट्टी सुरूच आहे. इतर खेळाच्या स्पर्धा घेण्यास महापालिका नापसंती दाखविते. निधी नसल्याचे कारण देत आयोजनास नकार देते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील एकही खेळाडू खेळत नसताना पालिकेकडून स्पर्धा आयोजनावर पाण्यासारखा खर्च केला जात असल्याने शंका उपस्थित केली जात आहे.

Back to top button