सोमेश्वरनगर : अतिरिक्त ऊस ठरणार कारखान्यांची डोकेदुखी | पुढारी

सोमेश्वरनगर : अतिरिक्त ऊस ठरणार कारखान्यांची डोकेदुखी

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना होत आहे. मात्र, ऊसतोड कामगार अजूनही कारखाना कार्यस्थळावर आले नसल्याने कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊस संचालक मंडळाची डोकेदुखी ठरणार आहे. परतीच्या पावसाने उसाची लावलेली वाटही यासाठी कारणीभूत ठरणार असून नोंदलेल्या उसाचे गाळप करण्यासाठी संचालक मंडळाची धावपळ होणार हे निश्चित आहे. अनेक कारखान्यांच्या हद्दीत हार्वेस्टर मशिन चालत नसल्याने त्या उभ्याच आहेत.

पर्यायाने कारखान्याला पुरेसा ऊस उपलब्ध होत नाही. विविध कारणांमुळे उशिरा सुरू झालेला हंगाम मे पर्यंत सुरू राहिल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र, ऊसतोड करणार्‍या मजुरांची घटत चाललेली संख्या, अतिवृष्टीमुळे लांबत चाललेला हंगाम आदी कारणांमुळे कारखान्यांना हार्वेस्टर यंत्रणा वाढवावी लागणार आहे तरच वेळेत गाळप होण्यास मदत होणार आहे.

पाण्याचे स्त्रोत वाढल्याने, हक्काचे पाणी उपलब्ध असल्याने, गेल्या काही वर्षात चांगला होत असलेला पाऊस, उसाच्या पिकातून हमखास होणारा फायदा यातून होत असलेली प्रगती यामुळे सहकारी आणि खासगी कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाचे विक्रमी उत्पादन घेतले जात आहे. पुरेशी यंत्रणा नसल्याने अखेरच्या टप्प्यात सभासद शेतकर्‍यांचा ऊसतोड करून ऊस गाळपास आणावा लागण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात ऊसतोडणी कामगारांकडून शेतकर्‍यांची पिळवणूक होते यालाही आवर घालण्याची गरज आहे.

मुबलक पाण्यामुळे जिरायती भागातील शेतकरीही आता उसाचे उत्पन्न घेत आहे. भाजीपाला, कांदा, सोयाबीन, डाळी आदीतून ठोस उत्पन्न मिळत नसल्याचे तसेच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने उसाची शेतीच परवडत असल्याची धारणा शेतकर्‍यांमध्ये झाली आहे. मात्र, साखर कारखान्यांनी उसाचे वेळेत गाळप करत एकरकमी एफआरपी दिली तरच शेतकर्‍यांसाठी उसाचे पीक फायदेशीर ठरणार आहे.

Back to top button