खड्ड्यांमुळे भूगावला वाहतूक कोंडी; खड्डे बुजविले नाही तर ग्रामस्थ करणार रास्ता रोको | पुढारी

खड्ड्यांमुळे भूगावला वाहतूक कोंडी; खड्डे बुजविले नाही तर ग्रामस्थ करणार रास्ता रोको

पिरंगुट; पुढारी वृत्तसेवा : भूगाव येथील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रशासनासाठी अतिशय किरकोळ असणारी ही बाब दररोज नागरिकांचे लाखो रुपये वाया घालवत आहे. प्रशासन तसेच पुणे -कोलाड महामार्गाचा ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांच्या अतिशय मौल्यवान असलेल्या वेळेचा अपव्यय होत आहे.

भूगावमध्ये प्रवेश करताना ओढ्याजवळ भलेमोठे खड्डे पडून त्यामध्ये पाणी साठत आहे. यामुळे वाहनांचा वेग प्रचंड कमी होत असून परिणामी माताळवाडी फाट्यापर्यंत तर कोथरूडच्या बाजूला इंगवले पेट्रोलपंपापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहे. प्रशासनाने जर ठेकेदाराला हे खड्डे अत्यंत तातडीने बुजविण्यास सांगितले तर काही तासातच हे खड्डे बुजवून होतील एवढे सोपे काम आहे. परंतु प्रशासनाच्या वेळकाढू भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मणके मोडण्याची वेळ आली आहे.

भूगावमधून कोथरूडकडे जाताना कांबळे वाड्यासमोर अनेक खोल खड्डे पडलेले आहेत. त्या ठिकाणी वाहनांचा वेग पुन्हा कमी होऊन वाहनांच्या रांगा लागत आहेत. हे खड्डे एवढे भयानक आहेत की अनेक दुचाकीस्वारांनी या ठिकाणी आपटी खाल्ली आहे. काही चारचाकी वाहनांचे शॉकरसुद्धा बेंड झालेले आहेत. त्यामुळे आमच्या वाहनांचे झालेले नुकसान आणि आमच्या मणक्याला होत असलेला त्रास याचे नुकसान भरून कोण देणार असा संतप्त सवाल येथून ये-जा करणारे वाहनचालक करीत आहेत. हे खड्डे जर तातडीने बुजविले नाही तर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Back to top button