भोसरी : बसथांबे बनले जाहिरातींचे घर | पुढारी

भोसरी : बसथांबे बनले जाहिरातींचे घर

भोसरी; पुढारी वृत्तसेवा : भोसरी परिसरातील बसथांब्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिसरातील अनेक ठिकाणी बस थांब्यावर जाहिरातीचे फलक बिनधास्त लावण्यात येत आहेत. परिणामी स्मार्ट सिटीतील बसथांब्यांचे विद्रुपीकरण होत आहे. भोसरीतील सरकारी मालमत्ता असलेले बसथांबे, विद्युत खांब, डी.पी. बॉक्स, दिशादर्शक फलकावर जाहिरातींचा भडिमार केल्याने भोसरीचे सौंदर्य हरवले असून, परिसराला विद्रुप स्वरूप प्राप्त झाले आहे. फुकटची जाहिरातबाजी करणार्‍यांवर पालिकेचे आकाशचिन्ह विभाग कोणतीच कारवाई करीत नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. बस थांबे विद्रुप करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

जाहिरातबाजी करणार्‍या आस्थापना, दुकाने, कोचिंग क्लासेस, इस्टेट एजंट, स्कूल, कामगार भरती यासारख्या फुकटच्या जाहिरातींमुळे भोसरी व परिसरातील सर्वच बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे. चकाचक दिसणारे बसथांबे आता जाहिरातींचे घर झाले आहे. परिसरात विजेचे दिवे लावण्यासाठी खांब उभारले आहेत. या विद्युत खांबावरसुध्दा आता जाहिरातींचे दर्शन घडू लागले आहे. प्रत्येक ठिकाण जाहिरातींनी व्यापून टाकल्याने काही जहिरातदारांनी चक्क झाडांना लक्ष्य केले.

झाडांच्या फांद्या तोडून त्यावर मोठे फ्लेक्स लावल्याचे परिसरात पाहावयास मिळते. प्रमुख चौकातील ठराविक जागा, विद्युत खांब या मोक्याच्या ठिकाणी जाहिरातींचे फ्लेक्स नेहमीच झळकत असतात. पालिकेच्या आकाशचिन्ह विभागात कुठलेही शुल्क न भरता, नियमबाह्य जाहिराती लावण्यामुळे पालिकेला भूर्दंड सहन करावा लागत आहे.

दोषींवर कारवाई करा
फुकटची जाहिरातबाजी करणार्‍या व परिसराचे सौंदर्य बाधित करणार्‍यांवर चाप बसविण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. दिवसेंदिवस परिसराच्या सौंदर्याकरिता लाखो रुपयांचा निधी खर्च होत असताना परिसर विद्रुप करणार्‍यांची गय कशासाठी ? असा प्रश्न आता नागरीक उपस्थित करीत असून, कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Back to top button