निरा नदी परिसरात पक्षी निरीक्षण; भोर तालुक्यात पक्षी सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना धडे | पुढारी

निरा नदी परिसरात पक्षी निरीक्षण; भोर तालुक्यात पक्षी सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना धडे

भोर; पुढारी वृत्तसेवा : निरा नदी, वाठार हिमा, नांद, पिसावरे या परिसरात पक्षी सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांनी हिवाळ्यात येणार्‍या पक्ष्यांचा अभ्यास केला. भोर एज्युकेशन सोसायटीच्या पिसावरे माध्यमिक विद्यालयात पक्षी सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले. गावच्या परिसरात पक्षी निरीक्षण फेरीमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे 53 पक्ष्यांचा अभ्यास केला. यामध्ये रशिया, नेपाळ, हिमालय व सैबेरिया आदि देशातून येणार्‍या पक्षांचाही समावेश आहे.

ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ सलीम अली व मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनानिमित्त 5 नोव्हेंबरपासून एक आठवडा पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. विद्यालयातील पक्षीनिरीक्षण मंडळ आणि पुण्यातील बार्न आऊल बर्डींग ग्रुपच्या सहकार्याने विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण फेरीचे आयोजन करण्यात आले.

पक्षी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सकाळी आठ ते साडेनऊ या वेळात आयोजित केलेल्या पक्षीनिरीक्षण फेरीत सुमारे 53 पक्षी नोंदवले गेले. यामध्ये रशियामधून येणारा नेपाळी गरुड, हिमालयातून येणारे ग्रे वॅगटेल (करडा धोबी), गुलाबी चिमणी तसेच काळ्या डोक्याचा भारीट व सैबेरियामधून येणारा सैबेरियन स्टोनचाट व शंकर (ब्लू थ—ोट) अशा प्रकारचे अतिशय सुंदर स्थलांतरित पक्षी आढळून आले. याशिवाय लाल मुनिया, नीलपंख, छोटा किलकिला, खंड्या यासारखे सुंदर पक्षीही विद्यार्थ्यांना पहावयास मिळाले.

विविध पक्ष्यांविषयी माहिती विद्यालयातील शिक्षक धनंजय कोठावळे व संतोष दळवी यांच्यासह बार्न आऊल बर्डींग ग्रुपच्या शुभांगी बरदाडे, विद्या बरदाडे, अंकिता चौधरी, ऋतुजा बरदाडे, संचिता बरदाडे, चैतन्य टोळे, साई शिरवळे, तुषार बरदाडे, पद्मनाभ दळवी, अरिंदम दळवी यांनी पक्षीनिरीक्षण फेरीत विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांविषयी माहिती दिली. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी पक्ष्यांचे फोटो टिपले.

Back to top button