जानेवारीत एसटीच्या पुणे विभागात 66 ई-बस | पुढारी

जानेवारीत एसटीच्या पुणे विभागात 66 ई-बस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : येत्या जानेवारी महिन्यात एसटीच्या पुणे विभागाच्या ताफ्यात 66 नव्या इलेक्ट्रिक एसटी बस दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम एसटीच्या पुणे विभागाकडून युध्दपातळीवर सुरू आहे.
शासनाच्या फेम 2 या योजनेअंतर्गत एसटी महामंडळ 150 ई-एसटी ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी 66 ई-एसटी बस पुणे विभागाला देण्यात येणार आहेत. या इलेक्ट्रिक गाड्यांच्या माध्यमातून नगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक या ठिकाणी प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असून, या गाड्या जानेवारी 2023 मध्ये पुण्यात येतील, असे एसटी प्रशासनाने सांगितले.

पहिल्या महिन्यात चांगला प्रतिसाद
एसटी महामंडळाने पुणे-नगर मार्गावर 1 जून 2022 रोजी पहिली इलेक्ट्रिक एसटी सुरू केली. या गाडीला आता 5 महिने झाले आहेत. या इलेक्ट्रिक गाड्यांना प्रशासनाने 270 रुपये तिकीट ठेवले आहे. एक ई-गाडी पुण्यातून सुटते, तर दुसरी गाडी नगरहून सुटते. या दोन गाड्यांच्या माध्यमातून पुणे-नगर-पुणे दिवसभरात चार फेर्‍या होतात. या गाड्यांना पहिल्याच महिन्यात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या महिन्यात या दोन गाड्यांच्या माध्यमातून 4 हजार 428 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्याद्वारे एसटी महामंडळाला 10 लाख 21 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

मुख्यालयामागेच 17 चार्जिंग स्टेशन
एसटीच्या पुणे विभागाच्या ताफ्यात लवकरच 66 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. त्यांच्या पायाभूत सुविधेसाठी आवश्यक असलेले 17 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम एसटीच्या पुणे विभागाच्या मुख्यालयामागेच युध्दपातळीवर सुरू असून, सुमारे 60 ते 70 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे.

Back to top button