पुणे : संशयातून प्रेयसीचा धारदार हत्याराने वार करून खून | पुढारी

पुणे : संशयातून प्रेयसीचा धारदार हत्याराने वार करून खून

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रेमप्रकरणातून नात्यातील तरुणानेच तरुणीवर संशय घेऊन धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना औंध परिसरात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. भरदिवसा झालेल्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी खून करणार्‍या तरुणासह त्याचे वडील आणि त्याच्या मित्रावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीचा खून केल्यानंतर तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची पथके त्याच्या मूळ गावी शोध घेत होती.

श्वेता रानवडे (वय 22, रा. औंध) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रतीक ढमाले, त्याचे वडील किसन ढमाले (वय 50) आणि प्रतीक याचा मित्र रोहित (वय 27) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याबाबत पीडित मुलीची आई दीपाली विजय रानवडे (46, सिद्धार्थनगर, औंध) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता व प्रतीक ढमाले यांच्यात गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याबाबत दोन्ही कुटुंबीयांच्या वतीने 2020 मध्ये त्यांचे लग्न करण्यास मान्यता दिली होती. मागील वर्षापासून आरोपी प्रतीक हा श्वेता हिच्यावर संशय घेऊन तिला वारंवार फोन करून त्रास द्यायचा, तसेच भेटून दमदाटी व शिवीगाळ करीत असे. यामुळे श्वेताने प्रतीकशी लग्न करण्यास नकार दिला होता. परंतु, प्रतीकचे वडील किसन ढमाले तसेच त्याचा मित्र रोहित हे श्वेता हिला लग्न करण्यासाठी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या दबाव टाकत होते. तिने प्रतीकसोबतच लग्न करावे; अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, अशी धमकी देत होते.

बुधवारी दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी व त्यांची मुलगी श्वेता हे सांगवी येथील एका सोनाराकडे गेल्या होत्या व तेथून काम आटोपून पावणेदोन वाजता फिर्यादी व त्याची मुलगी दुचाकीवरून सिद्धार्थनगर, फेज 1 मधील 6 डी 5 येथील आपल्या घरी परतल्या. गाडी पार्क करण्याकरिता फिर्यादी या गाडीवरून खाली उतरल्या. या वेळी फिर्यादी यांची मुलगी श्वेता ही गाडीवरच होती. त्या वेळी अचानक आरोपी प्रतीक ढमाले हा मोटारसायकलवर फिर्यादी व त्याची मुलगी श्वेता यांच्याजवळ आला.

त्या वेळी फिर्यादी यांना आरोपीच्या हातात चाकूसारखे हत्यार दिसले. त्या वेळी काही एक न बोलता प्रतीकने श्वेताच्या पोटावर, छातीवर, हातावर धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केले. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य पाहता सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी भेट दिली. बुधवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघेही तरुण उच्चशिक्षित असून, ते दोघेही नातेवाईक आहेत. त्यांचे दोघांचे प्रेमसंबंध गेल्या पाच वर्षांपासून होते. त्यांचे लग्नदेखील ठरले होते. परंतु, दोघांच्यात काही कारणास्तव खटके उडाल्याने चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. तिला उपचारांसाठी दाखल करण्यात आल्यानंतर तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. आमचा पुढील तपास सुरू आहे.
                                                                  – राजकुमार वाघचौरे,
                                                  वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चतुःशृंगी पोलिस ठाणे

Back to top button