कुरकुंभ एमआयडीसीतील कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट | पुढारी

कुरकुंभ एमआयडीसीतील कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसीतील शोगन ऑरगॅनिक्स लिमिटेड कंपनीत रासायनिक प्रक्रियेदरम्यान रिअ‍ॅक्टरचा जबरदस्त स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, तीन कामगार जखमी झाले. जखमींना दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमीत बंडगिरे (वय 27, रा. दौंड), उपेंद्र सिसोदिया (वय 37), हरिकिशन (वय 43, पूर्ण नाव-पत्ता नाही) अशी जखमींची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

शोगन ऑरगॅनिक्स लिमिटेड प्लॉट क्रमांक डी 18 कंपनीत मंगळवारी (दि. 8) प्रोप्राजेल क्लोराइडची रासायनिक प्रक्रिया सुरू होती. यादरम्यान रिअ‍ॅक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे हा स्फोट झाल्याची माहिती समजते. स्फोटाची तीव—ता भयानक होती. आजूबाजूच्या परिसरात जबरदस्त हादरा बसला. आगीच्या ज्वाला उंच उडाल्या होत्या. घटनास्थळीच्या शेडवरील पत्रे उंचावर उडून लांब खाली पडले होते. एमआयडीसीतील अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.

कंपनीत घडलेल्या घटनेत तीन कामगार जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी त्वरित दौंडमधील खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. स्फोटासंदर्भात सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

                                                                         – युवराज घारगे,
                                                                       कंपनी व्यवस्थापक

Back to top button