पुणे : नियमित लसीकरणात ‘एचपीव्ही’ हवी! देशातील प्रति 53 महिलांपैकी एकीला गर्भाशयमुखाचा कर्करोग | पुढारी

पुणे : नियमित लसीकरणात ‘एचपीव्ही’ हवी! देशातील प्रति 53 महिलांपैकी एकीला गर्भाशयमुखाचा कर्करोग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महिलांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. 30 ते 69 वयोगटातील महिलांमध्ये कर्करोगाने होणार्‍या मृत्यूपैकी 17 टक्के मृत्यू हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे होतात. तरीही, मुलींच्या नियमित लसीकरणामध्ये एचपीव्ही लस समाविष्ट करण्याची प्रदीर्घ प्रलंबित मागणी अद्यापही अपूर्ण राहिली आहे. जागरूकतेचा अभाव आणि एचपीव्ही लसीची जास्त किंमत यामुळे लसीला कमी प्रतिसाद मिळत आहे.

एका संशोधनानुसार, भारतात 53 पैकी 1 महिलेला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. त्या तुलनेत अधिक विकसित देशांमध्ये 100 पैकी 1 महिला कर्करोगाची बळी ठरते. अलीकडेच पार पडलेल्या सर्वेक्षणानुसार, एक कोटी महिलांच्या तपासणीमध्ये सुमारे 10 हजार 666 संशयित गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची ओळख पटली आहे.

गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी बोलण्याविषयी लोक सहसा टाळतात. यावर लस उपलब्ध असली तरी ती खूप महाग आहे आणि वयाच्या 15 वर्षांपूर्वी देणे आवश्यक आहे, तथापि, सामान्य लोकांमध्ये कमी जागरूकतेमुळे, लस घेण्याचे प्रमाण कमी आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता सरकारने त्याचा नियमित लसीकरणाचा भाग म्हणून समावेश केला पाहिजे, अशी अपेक्षा ‘कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालिका अनिता पीटर यांनी व्यक्त केली.

‘सिरम’कडून पुढल्या वर्षी लस
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरोधी लसीचे उत्पादन 2023 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होईल. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया स्वतःची लस लॉन्च करणार आहे. लसीची किंमत 200 ते 400 रुपयांच्या दरम्यान असेल, असे सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे. लसींचे उत्पादन 20 कोटींपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढवले जाणार आहे.

लस नियमित लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे. एचपीव्ही लस किशोरवयीन मुलींना दिली जाणार आहे. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये या लसीची किंमत सुमारे 2,000 रुपये आहे.
                              – डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा

Back to top button