भिगवण : दोन लाखांचे सात लाख देऊनही सावकाराची हौस फिटेना | पुढारी

भिगवण : दोन लाखांचे सात लाख देऊनही सावकाराची हौस फिटेना

भिगवण; पुढारी वृत्तसेवा: व्याजाने दिलेल्या दोन लाखांचे सात लाख रुपये फेडले, तरीही सावकारांची हाव काही सुटायला तयार नाही. त्यामुळे अजूनही 40 लाख रुपये देण्याची मागणी करणार्‍या सात सावकारांविरुद्ध भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेल्यामध्ये फलटण तालुक्यातील पती-पत्नीचा तसेच दौंड तालुक्यातील एक, इंदापूरमधील एक अशा चार व तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापूराव नभाजी कुलाळ आणि पत्नी संगीता (दोघे रा. तरटगाव, ता. फलटण, जि. सातारा), बाबू गेणू वाघमोडे (रा. मलठण, ता. दौंड), कुंडलिक जनार्धन भिसे (रा. पिंपळे, ता. इंदापूर) व इतर अज्ञात तीन अशा सात जणांविरुद्ध भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंबादास भिसे आर्थिक अडचणींत असल्याचा गैरफायदा घेत बापूराव व संगीता कुलाळ यांनी इतर साथीदारांच्या मदतीने 5 टक्क्यांनी दोन लाख रुपये दिले व सुरक्षेसाठी पिंपळे येथील गट नंबर 28 मधील 40 आर जमीन खरेदी खत करून घेतली.

यावर अंबादास भिसे यांनी दोन लाख रुपयांचे 6 लाख 95 हजार रुपये फेडले व नावावर केलेली जमीन परत मागितली. त्यावर सावकारांनी जमीन परत देणे तर सोडाच, पण अजून मुद्दल व व्याजाची अशी 40 लाख रुपयांची मागणी केली. तसेच खरेदी करून घेतलेल्या जमिनीची नोंद करू नये, यासाठी अर्ज दाखल केल्याने सावकार व त्यांचे अनोळखी साथीदारांनी भिसे यांना बेदम मारहाण केली.

अखेर सावकारांच्या छळापुढे हतबल झालेल्या भिसे यांनी भिगवण पोलिसांत रीतसर फिर्याद दाखल केली. यावरून भिगवण पोलिसांनी वरील सात जणांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध कायद्यानव्ये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम तपास करीत आहेत.

Back to top button