भवानीनगर : ऊसदराचे आंदोलन पेटण्याची शक्यता; शेतकरी संघटनांचा आक्रमक पवित्रा | पुढारी

भवानीनगर : ऊसदराचे आंदोलन पेटण्याची शक्यता; शेतकरी संघटनांचा आक्रमक पवित्रा

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांना एफआरपी देऊनही मोठ्या प्रमाणात पैसे शिल्लक राहत आहेत. या शिल्लक राहिलेल्या पैशातील हिश्श्याची शेतकरी संघटना मागणी करू लागल्या असून, ऊस उत्पादक शेतकर्‍याला उसाला एफआरपीपेक्षा जादा भाव मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक होऊ लागल्या आहेत. परिणामी, शेतकरी संघटनांचे ऊसदराचे आंदोलन लवकरच पेटण्याची शक्यता आहे.

शेतकर्‍यांच्या शेतीमालाला तसेच उसाला उत्पादन खर्च भरून निघेल एवढा देखील भाव मिळत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटातून जात आहे. अनेक साखर कारखाने कारखानदारी अडचणीत असल्याचे दाखवत असून, उसाला एफआरपीपेक्षा जादा भाव देता येत नसल्याचे सांगत आहेत. परंतु, ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात असल्यामुळे उसाला एफआरपीपेक्षा जादा भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनांमधून होऊ लागली आहे.

पूर्वी शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत होत्या. परंतु, उसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे उसाचे आगार असणार्‍या पश्चिम महाराष्ट्रात देखील आता शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊ लागल्या आहेत. यासाठी शेतकरी संघटनांनी जनजागृती करण्यासाठी सुरुवात केली आहे.

ऊस उत्पादक शेतकर्‍याला एफआरपीपेक्षा जादा भाव मिळाला तरच ऊस उत्पादक शेतकरी टिकणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना, याबरोबरच अनेक शेतकरी संघटना उसाला एफआरपीपेक्षा जादा भाव मिळण्यासाठी आक्रमक झालेल्या आहेत. त्यामुळे ऊसदराचे आंदोलन बर्‍याच वर्षांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

उसाच्या भावाला बसणार फटका
एफआरपी जाहीर करताना वाढविण्यात आलेला एक 1.75 टक्के साखर उतार्‍याचा बेस व एक टक्का पीक सरासरी मिळून 2.75 टक्के साखर उतार्‍याचा उसाच्या भावात फटका बसत आहे. उसाची एफआरपी जाहीर करताना सव्वादहा टक्के साखर उतार्‍यावर प्रतिटक्का साखर उतार्‍याला 300 रुपयांप्रमाणे एफआरपी जाहीर करण्यात येते.

त्याप्रमाणे 2.75 टक्के गुणिले 300 रुपये केल्यास 825 रुपयांचा फटका ऊस उत्पादकांना उसाच्या भावामध्ये बसत आहे. तसेच केंद्र सरकार एफआरपी जाहीर करताना उसाच्या उत्पादनात ऊसतोडणी वाहतुकीचा खर्च प्रतिटन 160 रुपये लावते. परंतु, प्रत्यक्षात मात्र ऊसतोडणी वाहतुकीचा खर्च 850 च्या पुढे धरला जातो. त्यामुळे एफआरपीच्या बेस बदलातील 2.75 टक्क्यांचे 825 रुपये व ऊसतोडणी वाहतुकीतील खर्चाचे 700 रुपये धरल्यास पंधराशे रुपयांचा फटका ऊस उत्पादकांना बसत आहे.

उसाची एफआरपी ही चुकीच्या पद्धतीने काढली जात आहे. वेळोवेळी एफआरपी जाहीर करताना साखर उतार्‍याचा बेस बदलून व ऊसतोडणी वाहतुकीचा चुकीच्या पद्धतीने खर्च लावून ऊस उत्पादकांची प्रतिटन सुमारे 1 हजार 500 रुपयांची लूट केली जात आहे. साखर उतार्‍याचा साडेआठ टक्के बेस ठेवून एफआरपी काढल्यास व तोडणी वाहतुकीचा योग्य खर्च लावल्यास ऊस उत्पादकांना किमान चार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो.

                                     – पांडुरंग रायते, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, शेतकरी संघटना

Back to top button