बेल्हे नगरीची धुळीपासून मुक्तता होईना ! | पुढारी

बेल्हे नगरीची धुळीपासून मुक्तता होईना !

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: दीड ते दोन वर्षे झाली तरी भयंकर धुळीपासून आणि क्षणोक्षणी व पावलोपावली अपघाताच्या भीतीपासून बेल्हेवासीयांची मुक्तता झालेली नाही. बेल्हे मुक्ताबाई देवीच्या मंदिरालगत बासपासच्या रस्त्याचे काम सुरू होऊन जवळजवळ दीड ते दोन वर्षे झाली आहेत, तरीही या भयंकर दुष्टचक्रातून नागरिकांची सुटका झालेली नाही. अगदी बेल्हे बसस्थानकापासून ते मुक्ताबाई देवीच्या मंदिरातपर्यंतचा प्रवास नागरिकांच्या माथी मारला जात आहे.

या रस्त्याच्या बाजूचे सर्वच तथाकथित ‘सेवा रस्ते’ संबंधित ठेकेदाराने बनवून दिले नाहीत. परिणामी, दुचाकी तसेच चारचाकीस्वारांना कसरत करत ये-जा करावी लागते. या वाटेवरून कुठूनही कुठेही जा, धुळीचे लोट अंगावर घेतच जावे लागते. अनेकदा तर या ‘धुळवडी’मुळे समोरचे दिसेनासे होते. त्यामुळे अंदाज बांधत वाहने पुढे हाकावी लागतात. त्यातच अति ओबडधोबड वाटेमुळे आणि ‘धुळवडी’मुळे दुचाकीस्वारांचा कधी तोल जाईल, याचाही नेम राहिलेला नाही.

पुन्हा एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जाताना नाका-तोंडात एवढी धूळ जाते की अनेकांचा श्वास गुदमरायला लागतो. या एकूण प्रकारामुळेच वृद्धांनी आणि मुलांनी तर बेल्हेनगरीतून जाऊच नये किंवा त्यांना नेऊच नये, असे म्हटले तर ते शहाणपणाचे ठरू शकते.
बेल्हेनगरीतून रात्री-बेरात्री जाताना अपघाताचा धोका आणखी वाढतो. एकीकडे धुळीचे लोट, दुसरीकडे ओबड-धोबड वाट, तर तिसरीकडे विद्युत दिवे नसल्याने अंधार, यामुळे अक्षरश: जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ अनेक महिन्यांपासून येत आहे. या स्थितीमुळे कधी कोण कुणाला धडकेल, याचीही शाश्वती राहिलेली नाही.

Back to top button