पुणे : मातृवंदना योजनेचा 69000 महिलांना लाभ | पुढारी

पुणे : मातृवंदना योजनेचा 69000 महिलांना लाभ

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू झाल्यापासून त्याअंतर्गत गेल्या पाच वर्षांत पुणे शहरात 69 हजार 64 महिलांना प्रत्येकी पाच हजार मिळून एकूण 34 कोटी 53 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. बालकांमधील कुपोषण कमी करता यावे तसेच माता सशक्त राहावी, यासाठी त्यांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत हा लाभ देण्यात येतो.

त्याद्वारे आई व बाळाचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. पुणे शहरात दरवर्षी 25 ते 26 हजार महिलांची प्रसूती होते. त्यापैकी बहुतांश प्रसूती या शासकीय केंद्रांत होतात, तर 40 टक्के प्रसूती खासगी रुग्णालयांमध्ये होतात.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी
लाभार्थी व पतीचे आधार कार्ड.
लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते.
गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसांच्या आत नोंद.
शासकीय संस्थेत गरोदर कालावधीत तपासणी.
बाळाचा जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण प्रमाणपत्र.
लाभार्थीने अटींची पूर्तता केल्यानंतर 30 दिवसांच्या आत लाभाची रक्कम अदा करण्यात येते.
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय संस्थेमध्ये तसेच शासनमान्य रुग्णालयात बाळंतपण झाल्यास या योजनेचे मिळणारे आर्थिक साहाय्य देखील मिळते.

असा मिळतो लाभ
कुटुंबातील जोडप्याच्या पहिल्या अपत्याचा गर्भ राहिल्यापासून त्याचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत महिलेला 5 हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य तीन टप्प्यांत देण्यात येते. गरोदरपणाची नोंद एएनएम यांच्याकडे मासिक पाळी चुकल्यानंतर 100 दिवसांच्या आत केल्यास पहिल्या टप्प्यात 1 हजार रुपये मिळतात. सहा महिन्यांनंतर गरोदरपणात किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी, सोनोग्राफी झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 2 हजार रुपये मिळतात. तिसरा व अंतिम 2 हजार रुपयांचा हप्ता बाळाचे जन्मनोंद प्रमाणपत्र तसेच 14 आठवड्यांपर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मिळतो.

कोठे कराल संपर्क?
आपल्या कार्यक्षेत्रातील आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका किंवा कोणतीही शासकीय आरोग्य संस्था येथे करावा. जानेवारी 2017 पासून आतापर्यंत शहरातील 69 हजार 64 महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.

वर्ष उद्दिष्ट लाभार्थी टक्केवारी
2017-18 9000 4922 17
2018-19 42000 11340 27
2019-20 43138 27602 64
2020-21 27000 12197 45
2021-22 27000 14026 52

Back to top button