पुणे : मृतांच्या कुटुंबांना ‘आदरांजली’चा हातभार! पीएमपी कामगारांची योजना | पुढारी

पुणे : मृतांच्या कुटुंबांना ‘आदरांजली’चा हातभार! पीएमपी कामगारांची योजना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कामावर असताना मृत्यू झाल्यास सरकारी मदत मिळतेच; मात्र एक आधार आणि आदरांजली म्हणून पीएमपीचे कर्मचारीच एकत्र येत मृत सहकार्‍याच्या कुटुंबीयांना मदत करीत आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत 88 मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना तब्बल 3 कोटी 52 लाख रुपयांची मदत पीएमपीच्या कर्मचार्‍यांनी केली आहे.

पीएमपी कर्मचार्‍यांनी एकत्र येत कर्मचार्‍यांच्याच कुटुंबीयांना मदत करण्यासाठी ‘आदरांजली’ ही योजना सुरू केली आहे. त्या योजनेनुसार पीएमपीच्या ताफ्यातील कर्मचारीच मृत सहकारी कर्मचार्‍याच्या कुटुंबीयांना हातभार म्हणून ही आर्थिक मदत करीत आहेत. एका मृत कर्मचार्‍याच्या कुटुंबीयांना तब्बल चार ते साडेचार लाख रुपयांची मदत केली जात असून, ही मदत कर्मचारी आपल्या पगारातील 50 रुपये कपात करून देत आहेत.

योजना जरी कर्मचार्‍यांची असली तरी यात पीएमपी प्रशासनाची देखील मोठी भूमिका आहे. या योजनेचे नियोजन आणि आर्थिक मदत कुटुंबीयांना पोहचविण्याची जबाबदारी पीएमपी प्रशासनाने घेतली आहे. या योजनेमुळे घरातील कर्ती-कमवती व्यक्ती सोडून गेली तरी मृत कर्मचार्‍याच्या कुटुंबीयांना आधार मिळत आहे.

अशी सुरू झाली योजना…
पीएमपीच्या कर्मचार्‍यांचे कामावर असताना मृत्यू होत होते. प्रशासनाकडून त्यांना 2 लाखांपर्यंत मदत दिली जाई. मात्र, ती तुटपुंजी असे. मग पुढे पीएमपीच्या मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनी करायचे काय? असा प्रश्न पीएमपीच्या अनेक कर्मचार्‍यांना पडला. मृत कर्मचार्‍यांच्या घरातील हाल-अपेष्टा पाहिल्या अन् त्यानंतर ही योजना सुरू करण्याचा विचार सर्वच कर्मचार्‍यांनी केला.

जानेवारी 2020 मध्ये प्रशासनाच्या सहकार्याने ही योजना सुरू करण्याचे ठरले. परंतु, त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करून तिची अंमलबजावणी डिसेंबर 2020 पासून सुरू झाली. त्याकरिता सर्व कर्मचार्‍यांनी यात सहभाग घेत या योजनेसाठी अर्ज भरून दिले. तेव्हापासून आतापर्यंत या योजनेमार्फत 88 मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना मदत झाली आहे.

अशी होते योजनेची अंमलबजावणी…
पीएमपीच्या ताफ्यात 9 हजारांपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी आहेत. या सर्व अधिकार्‍यांच्या आणि कर्मचार्‍यांच्या पगारातून दरमहा 50 रुपये एका मृत कर्मचार्‍याच्या कुटुंबीयांना देण्यासाठी कपात होते. महिन्यात जर एकापेक्षा अधिक कर्मचार्‍याचा मृत्यू झाला असेल तर महिन्याला 4 मृत कर्मचारी असे असेल, तर प्रत्येकी 200 रुपये पगारात कपात केली जाते.

एकूण सर्वच कर्मचार्‍यांच्या पगारातून पैसे कपात झाल्यावर ती रक्कम मृत कर्मचार्‍याच्या कुटुंबीयांना दिली जाते. अशा पध्दतीने आतापर्यंत 3 कोटी 52 लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. आता फक्त 4 ते 5 मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देणे बाकी आहे.

‘आदरांजली फंड’ ही योजना सुरू होऊन आता वर्ष, दीड वर्ष झाले. त्यामार्फत 88 मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली आहे. कामगारांनी कामगारांसाठी सुरू केलेली ही स्तुत्य योजना आहे. फक्त ती राबविण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. प्रत्येक कर्मचार्‍याच्या पगारातून एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना देण्यासाठी दरमहा 50 रुपये कपात होते. ती रक्कम त्या मृत कर्मचार्‍याच्या कुटुंबीयांना दिली जाते.

                                         – सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल

Back to top button