मावळातील इंद्रायणी तांदूळ खरेदी करणार; शेती सोसायट्यांच्या माध्यमातून उपक्रम | पुढारी

मावळातील इंद्रायणी तांदूळ खरेदी करणार; शेती सोसायट्यांच्या माध्यमातून उपक्रम

तळेगाव दाभाडे; पुढारी वृत्तसेवा: मावळ तालुक्यातील सर्व प्राथमिक शेती विकास सोसायट्याच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला इंद्रायणी भात खरेदी करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी दिली. मावळ तालुका हा खरीप भातपिकाचे आगार आहे.

या तालुक्यात सुमारे 13 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरीप भातपिक यावर्षी घेण्यात आलेले आहे. यावर्षी भात पिकाला पोषक असा पाऊस झालेला असल्याने शेतकरी समाधानी आहेत. तर एकरी उत्पादनही चांगलेच येणार, असा विश्वास शेतकरी बांधवाकडून व्यक्त होत आहे.

दरवर्षी मावळ तालुक्यातील खरीप भातपिक उत्पादक शेतकरी आपल्या शेतात पिकविलेला इंद्रायणी भात आपल्याला लागतो तेवढा घरी ठेवून बाकीचे भात कामशेत, पवनानगर, टाकवे. वडगाव तळेगाव आदी बाजारपेठेत मिळेल तशा दराने विकत असतात. यावर्षी प्रथमच सहकार महर्षी व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी शेतकर्‍यांचा पिकविलेला भात शेती विकास सोसायट्यांमार्फत विकत घेण्याची योजना हाती

घेतली आहे. त्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरीव अर्थसहाय्य कॅश क्रेडिटच्या माध्यमातून करणार आहे.
भात विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना संबधित शेती सोसायटी त्याच दिवशी पेमेंट नजीकच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखेतून करणार असल्याचे बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी सांगितले.

इंद्रायणीचा खरेदीदर 23 रुपये…
या इंद्रायणी भाताचा खरेदी दर प्रतिकिलो 23 रुपये निश्चित करण्यात आलेला आहे. हा दर अतिशय चांगला असल्याने शेतकर्‍यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन दाभाडे यांनी केले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मावळ विभागाचे विभागीय अधिकारी गुलाबराव खांदवे, वसुली अधिकारी नीरज पवार याबाबत विशेष परिश्रम घेत आहेत.

Back to top button