चला जाऊ बिबट्याचे दर्शनाला; ओतूरच्या युवकांनीच केली बिबट सफारी सुरू | पुढारी

चला जाऊ बिबट्याचे दर्शनाला; ओतूरच्या युवकांनीच केली बिबट सफारी सुरू

ओतूर; पुढारी वृत्तसेवा: जुन्नर तालुक्यात विशेषतः ओतूर आणि परिसरात बिबट्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काळोखात बिबटयांचा खुलेआम वावर दिसून येत असल्याने बिबटे ओतूर परिसरातील वाड्या-वस्त्यांना जाणाऱ्या रस्त्यांवर रात्रीच्या अंधारात बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत.

हे ओतूरमधील काही युवकांच्या लक्षात आल्यामुळे रात्री ११ वाजेनंतर बहुतांश युवक बिबट्याच्या हालचाली मोबाईलद्वारे व्हिडिओतून टिपण्यासाठी व बिबट्याला पहाण्यासाठी बंदिस्त चारचाकी गाडीतून गटागटाने रानावनाकडे जाणाऱ्या रस्त्याने प्रवास करून बिबट्याचे दर्शन घेत आहेत. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत बिबट सफारी प्रकल्प आंबेगव्हान येथेच होणार असल्याचे जाहीर केले आहे;

मात्र या बिबट सफारी प्रकल्प कामाला ”देर ना हो जाये” असेच दररोज रात्री बिबट्या बघायला जाणाऱ्या युवकांना तर सांगायचे नाही ना? असा सवाल उपस्थित झाला आहे. ओतूर, रोहकडी, आंबेगव्हान, लागाचा घाट रस्ता, गाढवेपट, पानसरेपट, पाथरटवाडी, अहीनवेवाडी, शेटेवाडी, उदापूर, मांदारने, डिंगोरे, आमलेशिवार, पानसरेवाडी, घुलेपट, धोलवड, हिवरे, ओझर या सर्व मार्गावर रात्री चारचाकी गाडीतून फेरफटका मारला असता दररोज हमखास बिबट्याचे सुलभ दर्शन होत असल्याचे अनुभव ओतूरचे युवक सांगत आहेत.

आफ्रिकन सफारीच्या धर्तीवर राज्यात बिबट्या सफारी नैसर्गिक अधिवास असलेल्या बिबट प्रवण क्षेत्रात आंबेगव्हान येथे सुरू करण्याची योजना माजी आमदार शरद सोनवणे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चिली जात आहे. गुजरातमधील गीर अभयारण्यात ‘सिंह सफारी’ काही वर्षांपासून सुरू आहे. जुन्नर वन विभागातर्फे नुकतीच या सफारीच्या जागेची पाहणी करण्यात आली होती. त्या धर्तीवर आंबेगव्हान येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बिबट्या सफारी’ ही आंबेगव्हान (ता. जुन्नर) येथेच होणार असल्याचे जाहीर केले आहे.

त्यामुळे आता या सफारीत पर्यटकांना नैसर्गिक अधिवासात बिबट्या पाहायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात बिबट्याचा वावर तुलनेने अधिक आहे. माणसाच्या वस्तीत बिबट्या प्रवेश करीत असल्यामुळे मानव व बिबट्या संघर्ष वाढत असल्याचे अनेकदा दिसून येते. आंबेगव्हान या ठिकाणी १५० हेक्‍टरहून अधिक वनक्षेत्र आहे. त्यापैकी ५० हे. जागेची निवड करून तेथे ही सफारी सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

राज्यभरातून जुन्नर तालुक्यात पर्यटक येण्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. जुन्नर तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ अधिक असल्याने तसेच नैसर्गिक अधिवास, मुबलक पाणी शांत वातावरण, दाट झाडी, मुबलक जागा, ओढे, रस्ते यामुळे ‘बिबट्या सफारी’साठी आंबेगव्हान येथील जागेची निश्चिती करण्यात आली आहे. बिबट् मानव संघर्ष व इतर समस्या कमी होण्यासोबत पर्यटनाला चालना मिळण्याकामी बिबट सफारी प्रकल्प कामाला लवकरात लवकर चालना मिळावी अशी जोरदार मागणी होत आहे.

बिबट सफारी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करा
बिबट्याबाबत जुन्नर तालुक्यातील वृत्त ऐकुन राज्यभरातील लोक प्रश्न विचारत असतातच मात्र आता चक्क सफारी केंद्र सुरू होण्याअगोदरच युवक वर्ग बिबट्याच्याच भेटीला स्वतःहुन जात असल्यामुळे रात्री-बेरात्री ओतूरच्या परिसरात चारचाकी गाड्यांची वर्दळ वाढली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूरपासून अवघ्या पाच किमी अंतर असलेल्या आंबेगव्हान या ठिकाणी बिबट सफारीची जागा निश्चिती झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे, जुन्नर तालुक्यातील नागरिक व पर्यटकांमध्ये हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Back to top button