वडगाव मावळ : सहाय्यक निबंधक अखेर निलंबित, महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकार्‍यांची कारवाई | पुढारी

वडगाव मावळ : सहाय्यक निबंधक अखेर निलंबित, महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकार्‍यांची कारवाई

वडगाव मावळ, पुढारी वृत्तसेवा: मावळ तालुक्यातील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांना अखेर निलंबित केल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी पल्लवी कोळेकर यांनी दिला आहे. या आदेशामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या सहायक निबंधक यांच्यावरील कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप

सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी एकवीरा गृहनिर्माण सोसायटी तळेगाव दाभाडे, पवना कृषक संस्था, काले कॉलनी व मावळ तालुक्यातील विविध विकास सोसायटीबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतदीनुसार कार्यवाही केलेली नाही. तसेच सदर संस्थांवर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अनियमित व जाणीवपूर्वक कामकाज केल्याचे निदर्शनास येत आहे, असा ठपका ठेवून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कुलगुरूंच्या कामकाजात हस्तक्षेप

सूर्यवंशी यांनी सहकार आयुक्त कार्यालयाचे परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात न घेता अवसायकाचा त्रैमासिक अहवाल न घेता अवसायकाला जास्तीचे मानधन मंजूर केले. डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांना अशासकीय भाषेत पत्र लिहून गैरवर्तन केले आहे. तसेच, विद्यापीठाच्या अंतर्गत बाबींशी काहीही संबंध नसतानाही कुलगुरूंच्या कामकाजात व त्यांचे अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केला, या आरोपांचाही उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.

भाजपने केली होती कारवाईची मागणी

एक महिन्यापूर्वी मावळ तालुका भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सूर्यवंशी यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांचे निलंबन करावे अथवा त्यांची तात्काळ बदली करावी, या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी कारवाई करणे शक्य नसेल, तर त्यांना मावळात येणे बंद करावे, अशी आग्रही भूमिका भाजपा पदाधिकार्‍यांनी घेतली होती. तसेच, माजी मंत्री बाळा भेगडे यांनी सहकार मंर्त्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. अखेर आज सूर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने या वादग्रस्त विषयावर पडदा पडला असून, प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Back to top button