बारामती : फळपीक विमा योजनेत सहभागी व्हा; तालुका कृषी अधिकार्‍यांचे शेतकर्‍यांना आवाहन | पुढारी

बारामती : फळपीक विमा योजनेत सहभागी व्हा; तालुका कृषी अधिकार्‍यांचे शेतकर्‍यांना आवाहन

बारामती; पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान पीक विमा योजनेत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2022-23 आंबिया बहारमध्ये आंबा, डाळिंब, द्राक्ष व केळी या फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा तालुक्यातील शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून तालुक्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.
पंतप्रधान पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकर्‍यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी ऐच्छीक आहे.

उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. नुकसानभरपाई महावेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात येते. बारामती तालुक्यातील समाविष्ट महसूल मंडळातील आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर असून विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये तर शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम 15 हजार 400 रुपये इतकी आहे.

डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत 14 जानेवारी 2023 असून विमा संरक्षित रक्कम 1 लाख 30 हजार रुपये तर शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम 9 हजार 750 रुपये इतकी आहे. द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2022 असून विमा संरक्षित रक्कम 3 लाख 20 हजार रुपये तर शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम 16 हजार रुपये इतकी आहे.

केळी फळपिकासाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2022 असून विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये तर शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम 7 हजार रुपये इतकी आहे. शेतकर्‍यांनी विमा नोंदणीकरिता राष्ट्रीय पीक विमा पोर्टलला भेट द्यावी अथवा मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सहाय्यकांशी
संपर्क साधावा, असे आवाहन बांदल यांनी केले आहे.

Back to top button