पुणे : मेट्रोच्या तिसर्‍या मार्गाच्या; व्हायाडक्टच्या कामाला वेग | पुढारी

पुणे : मेट्रोच्या तिसर्‍या मार्गाच्या; व्हायाडक्टच्या कामाला वेग

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रो मार्गावरील खांब उभारणीचे शतक झाले असून, त्यावरील व्हायाडक्ट (पूल) उभारणीसाठी गर्डर लाँचर बसविण्यात येत आहेत. आठ गर्डर लाँचरच्या साह्याने सेगमेंट बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या प्रत्येक गर्डर लाँचरची लांबी सुमारे 70.5 मीटर आहे. हिंजवडी फेज तीन येथे आणि बालेवाडी स्टेडियम येथे एकूण तीन गर्डर लाँचरची उभारणी झाली आहे. बाणेर रस्त्यावरील सिंध सोसायटी येथे चौथ्या गर्डरच्या जुळणीचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर हा पुण्यातील तिसरा मेट्रो मार्ग उभारणीचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने सुरू केले आहे. त्यासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

मार्चमध्ये प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला. तीन ठिकाणी पाईलिंग मशिनच्या साह्याने खांबांच्या पायासाठी खोदाई करण्यात येत आहे. मेट्रोच्या तिसर्‍या मार्गासाठी एकूण 112 खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. त्या खांबांवर सेगमेंट बसविण्यासाठी गर्डर लाँचर उभारणीचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे.

Back to top button