भामा आसखेड : पाणी योजनेच्या जॅकवेलचे काम सुरू | पुढारी

भामा आसखेड : पाणी योजनेच्या जॅकवेलचे काम सुरू

भामा आसखेड, पुढारी वृत्तसेवा: भामा आसखेड धरण प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना धरणावरून पुणे मनपासाठी पाणी योजना करण्यात आली. आता पिंपरी-चिंचवड शहराला धरणावरून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी जॅकवेलच्या कामालाही हळूहळू गती येऊ लागली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक होऊ लागले आहेत. जॅकवेलच्या कामाला आंदोलनाद्वारे प्रकल्पग्रस्तांकडून प्रखर विरोध केला जाण्याची शक्यता आहे.

खेड तालुक्याच्या करंजविहिरे येथील भामा नदीवर 8.14 टीएमसी पाणीसाठा क्षमतेचा भामा आसखेड धरण प्रकल्प 2009 साली पूर्ण झाला. या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांनी घरादारासह शेतजमिनीचा त्याग केला असताना शासनाने अनेक प्रकल्पग्रतांना वार्‍यावर सोडून अद्याप त्यांचे पुनर्वसन केले नाही. न्याय हक्क मागण्यासाठी न्यायालयात हेलपाटे मारता मारता अनेक प्रकल्पग्रस्त हयात राहिले नाहीत, अशी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झाली. प्रकल्पग्रस्त पुनर्वसन करून शेतजमिनी मिळाव्यात म्हणून न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने पुनर्वसन करावे म्हणून आदेश दिले, परंतु शासन शेत जमिनीचा ताबा देऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्त त्रस्त झाले आहेत.

पुणे मनपाच्या पूर्व भागाला धरणावरून पाणीपुरवठा योजना होत असताना प्रकल्पग्रस्तांनी जलवाहिनीचे काम अनेकवेळा रोखले होते. त्या वेळी पोलिसांनी अनेक प्रकल्पग्रस्तांवर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. आता पिंपरी-चिंचवड मनपासाठी धरणावरून पाणी योजना होणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवडवरून करंजविहिरे गणेशखिंडपर्यंत जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे.
आता फक्त गणेशखिंड ते भामा आसखेड धरण जलाशयाजवळ जॅकवेलचे काम होणार आहे. जॅकवेलला सुरुवात होऊ लागल्याने आता आरपारची लढाई करण्यासाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक होऊ लागले आहेत.

Back to top button